उड्डाणपुल, फुटपाथवरील बेघरांवर महापालिका-पोलिसांची धडक कारवाई
स्नेहाची संमेलने वाढोत !
डिसेंबर-जानेवारी महिने म्हणजे शाळा-महाविद्यालयांचे क्रीडा महोत्सव, स्नेहसंमेलने, सहली यांनी भारलेले दिवस! हाच काळ हिवाळ्याचा. गुलाबी..कधी कधी बोचऱ्या थंडीचा! पावसात न्यावी लागते तशी छत्री नको.. की चिखलात पाय माखायला नको; उन्हाळ्यात होते तशी अंगांगाची काहिली नको..असा हा झक्कास ऋतु. व्यायाम सुरु करण्याचे बेत आखून थंडीमुळे अंथरुणाबाहेर पडताच न आल्याने तसले बेत हवेतल्या हवेत विरण्याचे हे दिवस! दृढनिश्चयी मंडळींनी लवकरात लवकर उठून गिर्यारोहण, बलसंवर्धन, धावणे, स्थानिक मॅरेथॉन स्पर्धा यात भाग घेऊन पारितोषिके पटकावण्याचेही हेच ते दिवस...
आमच्या तरुणपणीच्या या दिवसांची आठवण आता होण्याचे कारण म्हणजे जागोजागी पार पडणारी स्नेहसंमेलने, क्रीडा स्पर्धा, त्यांचे पारितोषिक वितरण समारंभ व व तेथे अतिथी म्हणून येत असलेले योग होय. यातीलच एक लक्षवेधी कार्यक्रम पाहण्यात आला तो सीवुड्स-दारावे भागात असलेल्या टिळक ज्युनियर कॉलेजचा. या कार्यक्रमाने मला थेट माझ्या शालेय-महाविद्यालयीन जीवनात नेले. कल्याण येथील ‘छत्रपती शिक्षण मंडळ' संचालित ज्ञानमंदिर हायस्कूल ही आमची शाळा. या संस्थेचे विद्यमान अध्यक्षपद नवी मुंबईकर असलेले श्री. नंदकुमार जोशी भूषवित आहेत. शाळेत व महाविद्यालयात जे संस्कार आपल्यावर होतात, जे जीवन आपण अनुभवतो त्याचा पगडा आयुष्यभर कायम राहतो. त्या शाळेत असताना मी पहिल्यांदा धावण्याच्या स्पर्धत भाग घेतला व दुसरा की तिसरा आलो असल्याचे मला पुसटसे स्मरते. माझे बाकीचे मित्र कब्बडी, आट्यापाट्या, लंगडी असल्या रांगड्या क्रीडाप्रकारांत भाग घेऊन चमकत असत. माझ्या त्या रांगड्या मित्रांना त्या त्या क्रीडाप्रकारांचा लाभही झाला. त्यातले अनेकजण रेल्वे, हिंदुस्थान पेट्रोलियम अशा केंद्र सरकारी आस्थापनांतून नोकऱ्या मिळवते झाले. त्या तुलनेत मी शाळेत पांढरपेशा धावण्यात भाग घेतला होता. पण नुसता अभ्यास एके अभ्यास करण्याऐवजी आपण सार्वजनिक जीवनातही पुढे आले पाहिजे हे त्या शाळेत मला उमगले. मग पुढे उल्हासनगरच्या आर के तलरेजा महाविद्यालयात गेल्यावर मला त्याचा लाभ झाला. बी ए द्वितीय वर्ष, एम ए प्रथम वर्ष व एम ए द्वितीय वर्ष अशी तीन वर्षे मी लागोपाठ स्टुडंट्स कौन्सिलवर वर्गप्रतिनिधी म्हणून निवडून गेलो. (अंतिम वर्ष बी.ए साठी मी कॉलेज बदलून डोंबिवलीच्या पेंढरकर कॉलेजात दाखल झालो होतो. तेथे प्रवेश घ्यायला उशिर झाला नसता तर तेथील वर्गप्रतिनिधीची निवडणुकही मी लढवली असती)
वाशी, नवी मुंबईतील माझे राहते घर हे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील (पूर्वीच्या ‘मॉडर्न') महाविद्यालयाजवळ आहे. त्यामुळे तेथील कोणत्याही स्पर्धा, महोत्सव, कार्यक्रम, ‘डे'ज यांची भनक दारावरुन जाणाऱ्या मुलामुलींच्या पेहरावावरुन, किलबिलाटावरुन, उत्साहावरुन मला लगेच लागते. आमच्या आर के तलरेजा महाविद्यालयात गॅदरिंगला होणारी विविध सादरीकरणे, मुंबई युनिव्हर्सिटीच्या विविध स्पर्धांमध्ये घ्यायचा सहभाग, त्यासाठी केल्या जाणाऱ्या तालमी, उशिरापर्यंत थांबून केलेले सराव, मैदानी खेळाच्या स्पर्धांसाठी मुले-मुली घेत असलेली मेहनत हे सारे आजही मला इतवया वर्षांनंतर लख्खपणे स्मरते. एकदा मला आमच्या काही मैत्रीणींनी मारुन मुटकुन समुह नृत्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी निवडले. नाचकाम हा माझा प्रांत केंव्हाच नव्हता. सुहाग चित्रपटातले ‘हे नामरे सबसे बडा तेरा नाम ओ शेरोवाली...' हे ते गाणे होते. गरब्याचे ते नृत्य होते. माझ्या समोर येणाऱ्या पोरी माझ्या हातातल्या टिपरीऐवजी जणू नेम धरुन माझ्या बोटांवर त्यांच्या हातातल्या टिपरीने दणका देत असेच मला वाटे. माझी निवड करुन माझीच बोटे सुजवायचे काम त्या पोरींनी केले. त्यामुळे मी त्या समुहनृत्यातून आपोआपच बाजूला झालो. कारण मला इलेक्ट्रॉनिक हार्मोनियम (ऑक्टोपॅड) वर गॅदरिंगमध्ये गाणे सादर करायचे होते. ते करुन मी इंस्ट्रुमेन्टल म्युझिक प्रकारात विजेताही ठरलो होतो. आर के तलरेजा महाविद्यालय उल्हासनगरात असल्याने तेथे त्या काळी पप्पू कलानी याचा अप्रत्यक्ष प्रभाव विद्यार्थी संघटनांवर दिसून येई. संजय दत्त हा आमच्या कॉलेजातील विद्यार्थी आमचा युनिव्हर्सिटी रिप्रेझेन्टेटीव्हही होता. कॉंग्रेसमधून पुढे जाऊन तो महाराष्ट्र विधानपरिषद आमदारही बनला होता. विजय गजानन पाटील हा माझा वर्गमित्र. एकेकाळी महाविद्यालयीन जीवनात विविध कुस्ती स्पर्धांतून आमच्या कॉलेजला अनेक पारितोषिके मिळवून देणाऱ्या विजयने कल्याणजवळील कोन गावात ‘गजाननराव पाडुरंग पाटील' या नावे महाविद्यालयही काढले आहे. त्याचीच बहीण प्रमिला हीही माझी वर्गमैत्रीण. पुढे जाऊन ती ठाणे जिल्हा सहकारी बँकेची उपमहाव्यवस्थापक बनली होती. बदलापूर नगरपरिषदेचे नगरसेविकापदही तिने भूषवले आहे. नवी मुंबईच्या सिमेवर असणाऱ्या विटावा गावचा लोकशाहीर दामोदर पाटील-विटावकर हा एम ए ची दोन वर्षे माझा सोबती होता. १९८६ साली हृदयविकाराच्या धक्क्यामुळे काळाने त्याला आमच्यातून ओढून नेेले. सुरेखा गरुड (विवाहानंतरची सुरेखा ठिगळे) हिने एम ए झाल्यावर पुढे कल्याणमध्ये स्वतःची ‘विद्यानिकेतन संगीत विद्यालय' ही संस्था काढली. विठ्ठल शिंदे या माझ्या वर्गमित्राने एम ए, बी एड, पी एच डी केले. तो ‘जी के एस महाविद्यालयाचा' प्राचार्य म्हणूनही कार्यरत होता. काही पुस्तकांचे लिखाणही त्याने केले. अभिनयात रुची दाखवली. नवी मुंबईत सीबीडी येथे स्थायिक झालेले जगद्विख्यात जादुगार, दृष्टीभ्रमकार सतिश देशमुख हेही आमच्याच आर के तलरेजा कॉलेजचे विद्यार्थी होय.
या सगळ्यांची मला प्रकर्षाने आठवण होेते. यातल्या सर्वांच्याच संपर्कात आजही आम्ही सारे आहोत. पण ते आभासी. थेट भेटी मात्र महाग झाल्यात. पण दहावीची बॅच ती दहावीची बॅचच! या बॅचने जसा लागलीच एखादे स्नेह संमेलन घ्यायला, एकमेकांकडे जायला, सहलींत सामील व्हायला उत्साह, होकार दर्शवून तसे करुन दाखवले; ते मात्र महाविद्यालयीन सोबत्यांकडून झालेले पाहायला मिळत नाही. काही दिवसांपूर्वी एका आध्यात्मिक अनुभवी गुरुजींसोबत चर्चा करताना त्यांनी लोकांचे, नातेवाईकांचे, जुन्या मित्रमंडळींचे, शेजार-पाजारच्यांचे, बहीणी-भावंडांचे विनाकारणही एकत्र येणे आजच्या आय टी युगात किती जरुरीचे आहे ते छान समजावून सांगितले. आता पूर्वीसारखी एकत्र कुटुंबे राहिलेली नाहीत. पूर्वीच्या काळी मोठ्या कुटुंबात एखादे अपंग, मतिमंद, ना कमावते मुल, दीर्घ आजारी व्यक्ती सहज सामावून घेतले जात असे. काका, आत्या, मावशा, मामा, भावंडे या केवळ व्यक्ती नव्हे..त्या जणू सामाजिक संस्था होत्या. त्यांच्यामार्फत सगळ्यांची योग्य ती काळजी घेतली जाई. पैशांची मदत, आजारपणातील सेवा, संकटप्रसंगीची धावाधाव यासाठी कर्ज काढण्याची किंवा केअर टेकरची गरज भासत नसे. आता विभक्त कुटुंबे आली. चाळी, वाडे, खोल्या हे जवळपास संपत गेले. बंगले, फ्लॅट्स, अपार्टमेन्टस, रो हाऊस आले. बंद दारे आली. त्यांना आणखी पुढे जाळीचे सेफ्टी डोअर आले. दारांना बाहेरुन येणाऱ्यांकडे संशयाने पाहणारी भोके व त्यांना लावलेली छोटी दुर्बिण आली. सीसीटीव्ही, सिक्युरिटी आले. थोडक्यात माणसाला माणसापासून, नातेवाईकांना नातेवाईकांपासून तोडणारे सारे काही आले. त्यामुळे झाले काय, की आय टी प्रशिक्षित नव्या पिढीला पगार गलेलठ्ठ, दारात गाडी व सारी सुखे हजर..पण त्यात भाग घ्यायला मात्र जवळचे कुणी नाही. सोबतीला मानसिक ताणतणाव, एकटेपणा, नोकरी व्यवसायातील गळेकापू स्पर्धा यांचे टेन्शन आहे ते वेगळेच!
यावर काहीच उपाय नाही का? तर आहे. नक्की आहे. मी मानसशास्त्राचा अभ्यासक आणि पदवीधर असल्याच्या अनुभवातून सांगतो..विनाकारणही एकत्र येणे, लोकांना भेटणे, अंतर्मुख नव्हे..तर बर्हिमुख होणे, इतरांच्या वाढदिवसाला जाणे, लग्नसमारंभ-बारसे-पूजा-वास्तुशांत-गृहप्रवेश-साखरपुडे-वर्धापनदिन-सहली यांत सामील होणे, मैत्रीचा-नात्याचा परिघ वाढवणे, आपला ‘स्व' किंवा ‘अहं' विसरुन लहान मुलांच्या मानसिकतेतून गप्पा गोष्टी हाणणे, प्रसंगी चावट-वात्रट जोक्स-भन्नाट किस्से सांगून हास्याचे स्फोट घडवून आणणे, ‘आम्ही तुमच्याकडे जेवायला येत आहोत' असे सांगून निकटवर्तीयांनाही आपल्या सहवासाचा आनंद घेऊ देणे, साधी चटई, सतरंजी अंथरुन भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, बटाटेवडे, समोसे, मिसळीचे बेत आखून ते पूर्णत्वास नेणे याचा अनुभव घ्या. बघा..तुमची काही अंशी तरी तणाव मुक्ती होते की नाही ते.
....आणि त्यासाठी हिवाळा हा अत्यंत उपयुक्त ऋतु आहे. तो काही केवळ शाळा-महाविद्यालयांच्या क्रीडा महोत्सव, स्नेहसंमेलनांसाठी राखून ठेवलेला नाही....आणि शिक्षण पूर्ण झालेल्या, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या किंवा त्यातूनही निवृत्त झालेल्या, पन्नाशी-साठी-सत्तरी ओलांडलेल्यांनी स्नेहसंमेलने आयोजित करु नये, त्यात भाग घेऊ नये असे कोणत्या टिकोजीरावाने सांगितलंय? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? २०२४ या वर्षातील या शेवटच्या ‘मुशाफिरी'नंतर येणाऱ्या २०२५ या नव्या कॅलेंडर वर्षासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई