मोहम्मद अली चौक रस्त्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण
कल्याण : कल्याण पश्चिम मधील मोहम्मद अली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले असून ॲम्ब्युलन्स देखील या वाहतूक काेंडीत अडकत असल्याने रुग्णाला वेळेत रुग्णालयात उपचारासाठी नेता आले नाही आणि संभाव्य जीवितहानी हानी झाली तर त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कल्याण पश्चिमेतील मोहम्मद अली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता बाजारपेठ रस्ता असून स्टेशनपासून जवळ असणाऱ्या या रस्त्यावरुन कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात पोहोचण्यासाठी करदात्या नागरिकांपासून प्रवाशांना देखील द्रविडी प्रणायाम करीत फुटपाथवरुन चालताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी, बेशिस्तपणे पार्क केलेली दुचाकी, चारचाकी गाड्या, फुटपाथलगत अनधिकृत ठेलेवाले, अनधिकृत हातगाड्या, अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा याला कारणीभूत आहे. तर बेशिस्त वाहन चालकांची रस्त्यावर वाहन चालविताना लेनची शिस्त न पाळता होणारी घुसखोरी आणि त्यातून होणारी वाहतूक कोंडी याला चाप कोण लावणार? असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.
याच रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर असणारे वाहतूक शाखा कार्यालय, केडीएमसी मुख्यालय या प्रशासकीय यंत्रणांना देखील यावर आवर घालता येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. २० जून रोजी दुपारी २.१५च्या सुमारास मोहम्मद अली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्या दरम्यान २ ॲम्ब्युलन्सला रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने सायरन वाजवून देखील १० मिनिटे त्यांना जाण्यास वाहतूक कोंडीमुळे वाव मिळाला नाही. ॲम्ब्युलन्समधून उपचारार्थ रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णाचे गोल्डन अवरला या वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने रुग्णाची जीवितहानी झाली तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल.
चार दिवसापूर्वी सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्या फेरीवाला पथकाबरोबर झालेल्या फेरीवाल्यांच्या वाद प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरीही येथील समस्या ‘जैसे थे' असल्याचे दिसते. या रस्त्यावर नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीचे ग्रहण प्रशासकीय यंत्रणा कसे सोडविणार? असा सवाल नागरिकांनी केला आहे. सदर रस्ता सुरळीत वाहतूक आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथ कधी मोकळे होणार? याची नागरिकांना प्रतिक्षा आहे.
महापालिकेची फेरीवाला हटाव मोहीम सुरुच असून या रस्त्यालगत दुचाकी पार्किंग संदर्भात वाहतूक विभाग यांच्यासमवेत बैठकीदरम्यान रस्त्यालगत रस्त्याच्या एका बाजुस दिवसाआड पार्किंग करण्याचे नियोजन आहे. बाजारपेठ मधील दुकानदारांच्या दुचाकी पार्किंगसाठी स्टेशन परिसरात असलेल्या महापालिका वाहनतळ येथे पार्किंग व्यवस्था सवलतीच्या दरात उपलब्ध होणार असल्याने दुकानदारांनी याचा लाभ घ्यावा. पार्किंगमुक्त रस्ता राहण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.
-धनंजय थोरात, सहाय्यक आयुक्त, क प्रभाग-केडीएमसी.