आ. मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या आरोपाची दखल घेऊन निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करा

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी १८ ऑक्टोबर व २० ऑक्टोबर २०२५ रोजी विविध प्रतिष्ठित प्रसार माध्यमांशी बोलताना नवी मुंबईत निवडणूक आयोगाचे अधिकारी पैसे घेऊन बोगस मतदार यांची नाव नोंदणी करतात, असा गंभीर आरोप केला आहे. मुळातच बेलापूर विधानसभेत साधारण १५ हजार दुबार नावे व १८ हजार बोगस नावे असल्याचे पुराव्या सहित निवेदन मनसे तर्फे गजानन काळे यांनी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी बेलापूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले होते. मात्र, त्या नंतर अद्याप पर्यंत यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे दिसून येते. यात भर म्हणून आ. मंदाताई म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारीच पैसे घेऊन अशी नावे नोंदवतात असा गंभीर आरोप केला आहे. 

महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य या संविधानिक पदावर असणारी व्यक्ती सबळ पुराव्याशिवाय असे आरोप करणार नाही. तरी याची दखल घेऊन ते कोण भ्रष्ट अधिकारी निवडणूक आयोगात आहेत यांची नावे व पुरावे मंदाताई म्हात्रे यांच्याकडून घ्यावे, अशी मागणी गजानन काळे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त  मिलिंद भारंबे यांच्या कडे केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी सुद्धा मनसे तर्फे केली. 

कर्नाटक राज्यात प्रत्येकी ८० रुपये घेऊन बोगस नावे टाकण्यात आल्याचे पुरावे SIT चौकशीत समोर आले. नवी मुंबईत सुद्धा अशा प्रकारे गुन्हा नोंदवल्यास पुढे चौकशीत अशा बऱ्याच बाबी समोर येऊ शकतात असे गजानन काळे काळे यांनी पोलिस आयुक्त यांना सांगितले.

मनसेच्या शिष्टमंडळात मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, महिला सेना शहरअध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, पालिका कामगार सेना शहरअध्यक्ष आप्पासाहेब कौठुळे, विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष संदेश डोंगरे, विभागअध्यक्ष अमोल आयवळे, भूषण कोळी, उपविभागअध्यक्ष राजेंद्र खाडे, विद्यार्थी सेना उपशहरअध्यक्ष प्रतिक खेडेकर, विभागअध्यक्ष प्रद्युम्न हेगडे, आदि उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे