शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने पिंपळाच्या झाडाला जीवनदान
नेरुळः मुसळधार पावसात वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडलेले नेरुळ, सेक्टर-५८ए मधील नवी मुंबई महापालिकेच्या बागेतील १५ ते २० वर्षे जुने पिंपळाचे झाड वृक्षप्रेमी असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उभे राहिले आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे आणि महापालिकेच्या तत्पर सहकार्यामुळे एका मोठ्या पिंपळाच्या झाडाला जीवनदान मिळाल्याने या शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाचे परिसरात कौतुक होत आहे.
१५ जुलै रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामध्ये शहरातील अनेक झाडे जमीनदोस्त झाली होती. त्यात नेरुळ, सेक्टर-५८ए येथील वनश्री सोसायटी शेजारील नवी मुंबई महापालिकेच्या बागेत असलेले साधारण १५ ते २० वर्षे जुने पिंपळाचे झाडही उन्मळून पडले होते. १६ जुलै रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी या बागेत गेलेले माजी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, निवृत्त महापालिका उपायुक्त राजेंद्र तेली, ‘सिडको'चे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे आणि निवृत्त पोलीस महानिरीक्षक एम. के. भोसले यांना मोठे पिंपळाचे झाड पडल्याचे निदर्शनास आले.
वृक्षप्रेमी असलेल्या या अधिकाऱ्यांनी तत्काळ सदर झाड पुन्हा उभे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली. आयुक्त डॉ. शिंदे यांनी देखील या उपक्रमाला त्वरित सहमती दर्शवून मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले. २ दिवसात उद्यान विभागाचे अधिकारी पाटील आणि कर्मचाऱ्यांनी मिळून मोठा खड्डा खोदला. त्यानंतर त्यांनी झाडाच्या वरच्या अनावश्यक फांद्यांची छाटणी केली. तसेच योग्य प्रमाणात पाने ठेवून झाड पुन्हा उभे केले. यावेळी अधिकाऱ्यांनी स्वतः उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सदर झाड उभे करण्यासाठी मदत केली. एकंदरीतच शासकीय अधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे एका मोठ्या पिंपळाच्या झाडाला जीवनदान मिळाल्याने या शासकीय अधिकऱ्यांचे कौतुक होत आहे.