सव्वा दोन लाख ग्राहकांकडे टीओडी स्मार्ट मीटर

कल्याणः महावितरणतर्फे अत्याधुनिक असे टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर लघुदाब वीज ग्राहकांकडे बसवले जात आहेत. कल्याण परिमंडलात आत्तापर्यंत २ लाख २६ हजार ग्राहकांकडे टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर प्रीपेड नाहीत. ज्या ग्राहकांकडे  हे मीटर बसवले जात आहेत, त्यांना पूर्वीप्रमाणेच विजेच्या वापरानंतर मासिक बिल दिले जात आहेत. या मीटरच्या माध्यमातून कोणत्या वेळेला किती वीज वापर होतोय, याची अचूक माहिती संबंधित ग्राहक व महावितरणला मिळणार आहे. त्यासोबतच या मीटरचा कोणताही आर्थिक भार ग्राहकांवर पडणार नाही. हे मीटर वीज ग्राहकांच्या फायद्याचेच असून या मीटरबाबत पसरवण्यात येणाऱ्या गैरसमज व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टीओडी मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून मीटर महावितरणच्या सर्व्हरला जोडलेले असते. त्यामुळे मीटरचा रिअल टाइम डाटा महावितरणकडे उपलब्ध होतो. त्यामुळे मीटर नादुरुस्त झाल्याची माहिती तत्काळ मिळू शकेल. मीटरचे रिडींग  ऑटोमॅटिक होणार आहे. यात मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव नाही. ऑटोमॅटिक मीटर रीडिंगमुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील. हे अत्याधुनिक मीटर असल्याने यात ग्राहकाला प्रत्येक तासाचा, दिवसाचा वीजवापर मोबाईलवर पाहता येइल. मीटर बसवण्यासाठी ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नसून केंद्र सरकारच्या निधीतून सवलत देण्यात येत आहे.

सध्या महावितरणने सर्व औद्योगिक ग्राहकांना टीओडी मीटर बसवलेले आहेत. त्यानुसार विशिष्ट कालावधीत वीज वापरासाठी महावितरणकडून औद्योगिक ग्राहकांना सवलत मिळते. याच धर्तीवर भविष्यात घरगुती ग्राहकांना विशिष्ट वेळी वीजवापर केला तर सवलत देण्याचे प्रस्तावित आहे. यात ग्राहकांचाच फायदा होईल. तसेच हे मीटर बसवल्याचा प्रचलित वीज दरांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकाच्या अत्यावश्यक सेवा व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून उपलब्ध