बेवारस वाहने, अनधिकृत फेरीवाले हटाव मोहीम

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि पदपथ नागरिकांना वापरासाठी मोकळे मिळावेत याकरिता नवी मुंबई महापालिका प्रशासन द्वारे रस्त्यावरील बेवारस वाहने आणि अनधिकृत फेरीवाले हटविण्याची धडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, रस्त्यावरील बेवारस वाहने आणि अनधिकृत फेरीवाले हटविण्याची धडक मोहीम महापालिका द्वारे यापुढे नियमितपणे सुरु राहावी, अशी अपेक्षा सुजाण नवी मुंबईकर व्यवत करीत आहेत.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील रस्ते रहदारीसाठी तसेच पदपथ नागरिकांसाठी खुले असणे गरजेचे आहे.  तथापि अनेक ठिकाणी रस्त्यावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने उभी असल्याचे चित्र दिसते. याशिवाय रस्त्यालगत आणि पदपथावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत नवी मुंबई शहराच्या सुनियोजित व्यवस्थापनाबाबत नियमितपणे आढावा घेतला जात असून, त्यामध्ये शहर सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या, कुठेही उभ्या असणाऱ्या वाहनांच्या आणि अनधिकृत व्यवसाय धारकांच्या होणाऱ्या उपद्रवाविषयी चर्चा करण्यात येत असते. रस्त्यावरील बेवारस वाहनांमुळे शहर स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण होत असून, याशिवाय अनधिकृत फेरीवाल्यांमुळेही स्वच्छतेला बाधा पोहचत आहे. या विषयाकडे अधिक गांभिर्याने लक्ष देत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना महापालिका कार्यक्षेत्रात उभी असलेली बेवारस वाहने हटविण्याबाबत महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम २३० आणि २३१ अन्वये विभाग कार्यालयांमार्फत सूचना पत्रक बजावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रस्त्यावरील बेवारस वाहने त्यांच्या मालकांनी स्वतःहून काढून टाकण्याबाबत अथवा हटविण्याबाबत रिक्षाव्दारे ध्वनीक्षेपकामार्फत जनजागृतीपर सूचना करावी, असेही सूचित केले आहे. या सूचना पत्रकांचा कालावधी संपुष्टात येताच संबधित विभाग कार्यालयामार्फत सदर बेवारस वाहने जप्त करुन टोईंगच्या सहाय्याने क्षेपणभूमी येथे जमा करुन सदर वाहनांवर नियमानुसार पुढील कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देशही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.

दरम्यान, नवी मुंबई शहराचा ‘सुनियोजित आधुनिक शहर', असा नावलौकिक असून, या नावलौकिकाला बाधा पोहचविणाऱ्या अनधिकृत घटकांना हटविण्याची मोहीम रस्ते, पदपथ यांचा नागरिकांना सुयोग्य उपयोग करता यावा या दृष्टीने महत्वाची असून, याकामी सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील बेवारस वाहने, अनधिकृत व्यवसाय करणारी वाहने हटविण्यासह पदपथावर व्यवसाय करुन रहदारीस अडथळा आणणारे अनधिकृत फेरीवाले आणि विक्रेते यांना हटविण्याची मोहीम तीव्र स्वरुपात राबविण्यात येणार आहे. - डॉ. राहुल गेठे, अतिरिक्त आयुक्त (२) - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महाराष्ट्र अंनिसने केले पोळी दान करण्याचे आवाहन