‘आपला दवाखाना'तील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे पगार बँक गॅरेंटीतून देणार
आणखी २५ दवाखाने सुरु करण्याचे नियोजन
ठाणे : ‘आपला दवाखाना' चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड ऑन गो हेल्थ प्रा. लि. कंपनीची सुमारे पावणे तीन कोटी रुपयांची बँक गॅरेंटी तसेच मे महिन्यापासून या कंपनीला देय असलेली रक्कम अशा दोन्ही रक्कमा ठाणे महापालिकेच्या ताब्यात आहेत. आवश्यकतेनुसार त्या रवकमांमधून ‘आपला दवाखाना'साठी नेमण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार, जागांचे भाडे अदा करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुस्पष्ट निर्देश दिल्याची माहिती उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी यांनी दिली आहे.
त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात, महापालिकेच्या ३३ आरोग्य केंद्रांच्या जोडीने, केंद्र शासनाच्या योजनेतून नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेत ४३ दवाखाने सुरु करण्यात आले आहेत. तर राज्य शासनाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना' या योजनेत १२ दवाखाने सुरु करण्यात आले आहेत. नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेत आणखी २५ दवाखाने नोव्हेंबर २०२५ अखेरपर्यंत सुरु करण्याचे नियोजन असल्याची माहितीही उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली.
‘आपला दवाखाना' या उपक्रमाबाबत गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून सातत्याने वृत्त येत आहेत. त्यात सदर उपक्रम बंद करुन कार्यरत डॉक्टर आणि कर्मचारी यांचे पगार थकले असल्याचा उल्लेख आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाने २७ ऑवटोबर रोजी महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली. उपायुक्त उमेश बिरारी यांनी या पत्रकार परिषदेत या संपूर्ण उपक्रमाची वस्तुस्थिती विशद केली. त्यावेळी महापालिकेच्या माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे उपस्थित होत्या.
ठाणे महापालिका क्षेत्रात महासभा ठरावानुसार निविदा प्रक्रिया राबवून ‘आपला दवाखाना' कार्यान्वित करण्यासाठी मे. मेड ऑन गो हेल्थ प्रा.लि या कंपनीची निवड करण्यात आली. ३१ जुलै २०२० रोजी त्यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे. यासंदर्भात ठाणे महापालिका आरोग्य विभाग, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि मे. मेड ऑन गो हेल्थ प्रा.लि या दोन पक्षांमध्ये करारनामा करण्यात आलेला आहे. या करारनाम्यातील अटी-शर्तीनुसार मे. मेड ऑन गो हेल्थ प्रा.लि. यांनी शहरामध्ये एकूण ५० दवाखाना सुरु करणे आवश्यक होते. सदर कार्यादेश अन्वये डिसेंबर २०२० मध्ये पहिल्या टप्प्यात ६ ठिकाणी ‘आपला दवाखाना' केंद्र सुरु करण्यात आले. परंतु, संपूर्ण करार कालावधीत सदर संस्था केवळ ४६ दवाखाने सुरु करु शकली, अशी वस्तुस्थिती आहे. ‘आपला दवाखाना' यांना कार्यादेश अंमलबजावणी दिनांकापासून (१ ऑगस्ट २०२० ते ३१ ऑवटोबर २०२५) कालावधीकरिता म्हणजे ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्थात सदर आदेश पारित केल्यानंतरही १४ ऑगस्ट २०२५ पासून आजपर्यंत संस्थेने एकही दवाखाना चालू केलेला नाही.
या दवाखान्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी जसे की, जागेकरिता येणारे भाडे, पाणी, वीज देयके, इंटरनेट कनेक्शन, एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका, औषधे, इतर सामुग्री उपलब्ध करुन देण्याची संपूर्ण जबाबदारी करारानुसार मे. मेड ऑन गो हेल्थ प्रा.लि यांची आहे. तसेच प्रत्येक ‘आपला दवाखाना'मध्ये कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, संबंधित कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे वेतन अदा करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांचीच आहे.
‘आपला दवाखाना' येथे तपासणी करिता येणाऱ्या रुग्णांसाठी प्रतिरुग्ण १५० रुपये प्रमाणे महापालिका मार्फत देयके अदा करण्यात येत आहे. संस्थेने सुरक्षा अनामत म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून २ कोटी ८९ हजार २ हजार ८०० रुपयांची बँक गॅरंटी महापालिकेकडे जमा केलेली आहे. सदर बँक गॅरंटी २१ ऑवटोबर २०२६ पर्यंत ग्राह्य आहे.
संस्थेने आता त्यांच्या ‘आपला दवाखाना'मध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी, इतर कर्मचारी यांना किती वेतन देण्यात आले आहे, याचा तपशील महापालिकेकडे सादर केलेला आहे. त्याची शहनिशा करुन एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या काळातील थेट कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून अदा करण्याबाबत महापालिका निर्णय घेईल. त्यासाठी संस्थेची २.८९ कोटींची बँक गॅरंटी आणि देयकांची रक्कम महापालिकेकडे आहे. त्यातून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांनुसार वेतन अदा करण्यात येईल, असेही उपायुक्त उमेश बिरारी यांनी यावेळी स्पष्ट केले.
नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे...
१५ व्या वित्त आयोग अंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात ६८ नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे प्रस्तावित आहेत. त्यापैकी ४३ आरोग्य मंदिरे काय्रान्वित झालेली आहेत. सदर आरोग्य केंद्रे सकाळी ९.३० ते दु. ४.३० या वेळेत सुरु असतात.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'
राज्य शासनाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेत ठाण्यात १२ ठिकाणी दवाखाने सुरु करण्यात आले आहेत. सदर दवाखाने दुपारी २ ते रात्री १० या वेळेत सुरू असतात. दवाखाने पाचपाखाडी, कासारवडवली, अमिनाबाद-कौसा, खारेगाव, पारसिक बोगद्याजवळ-आतकोणेश्वर, मुंब्रा हिल, रामनगर, येऊर, गणेश नगर, पानखंडा, पातलीपाडा, कोलशेत या ठिकाणी आहेत.