कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी!
कल्याण : गेल्या काही वर्षात वारीच्या निमित्ताने एक नवा रंग मिसळला रांगोळीकरांचा. आषाढीच्या या पंढरपूरच्या वारीतील भक्ती रसात लहानांपासून वयोवृध्दांपर्यंत सगळेच रममाण होतात. अभंग गात गात तर कधी सेवा करत विविध कलाकार तरुण मंडळी रांगोळीच्या माध्यमातून ज्ञानोबा- तुकाराम यांच्या गजरात तितक्याच तल्लीनतेने रांगोळी सेवा करीत आनंद घेत असतात.
वारीतील पायघड्या रांगोळी असतील किंवा रिंगण मधील रांगोळ्या असतील, वारकरी भक्त कलाकारांचे नेहमी कौतुकच करतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आषाढी एकादशीला भव्य मोठमोठ्या रांगोळ्या कलाकार काढतात आणि भक्तिमय वातावरणात सहभागी होतात. प्रत्येक कलाकाराला नाविन्यपूर्ण कलात्मक रांगोळी काढण्याचा ध्यास लागतो एका अर्थाने ती त्यांची वि्ील भक्तीच असते.
छत्रपती शिक्षण मंडळाचे नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण उपक्रमशील कलाशिक्षक रांगोळीकार श्रीहरी पवळे यांनी सुध्दा नाविन्यपूर्ण रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे. महान संत संतश्रेष्ठ सावता माळी यांचा अभंग कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, या अभंगाचा आधार घेऊन विविध भाज्यांमधून रांगोळीच्या माध्यमातून श्री वि्ीलाची प्रतिकृती साकारली आहे. ८ बाय ३.५ फुट आकाराची यामध्ये एकूण ४ किलो भाजी लागली. या अनोख्या रांगोळीसाठी श्रीहरी पवळे यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अभंगाप्रमाणे वापरल्या गेल्या असून त्यासाठी त्यांना ४ तास वेळ लागला आहे.