घोडबंदर किल्ल्यावरील भगवा झेंडा जीर्णावस्थेत
भाईंदर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या घोडबंदर किल्ल्यावरील भगवा झेंडा जीर्णावस्थेत फडकत आहे. तसेच किल्ल्यावर छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन घोडबंदर किल्ला असा उल्लेख असणारा फलक आणि किल्ल्यावरील विविध झाडांची माहिती देणारे फलक गायब झाल्याचे उघडकीस आले आहे.
इतिहास अभ्यासकांच्या नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला शिवकालीन घोडबंदर किल्ला मिरा- भाईंदर महापालिका क्षेत्रात येतो. गड किल्ल्यांचे जतन संवर्धन-संरक्षण याची जबाबदारी शासनाच्या पुरातत्व विभागाकडे आहे. काही कारणास्तव दुर्लक्षित झालेल्या या किल्ल्याचे संरक्षण-संवर्धन व्हावे यासाठी तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून घोडबंदर किल्ला देखभाल-दुरुस्तीसाठी ५ वर्षांपूर्वी महापालिकेकडे वर्ग करण्यात आला. यासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला होता. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन सूचना आणि परवानगीने किल्ल्याच्या संरक्षणाचे काम पूर्ण केले गेले. त्यानंतर किल्ल्यावर १०५ फुट उंच असा एक भव्य भगवा झेंडा लावण्यात आला.
सतत फडकणारा झेंडा सध्या जीर्णावस्थेत आहे. तसेच किल्ल्यावर छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन घोडबंदर किल्ला असा उल्लेख असणारा फलक आणि किल्ल्यावरील विविध झाडांची माहिती देणारे फलक गायब झाल्याचे शिवप्रेमी सामाजिक कार्यकर्ते सचिन जांभळे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित महापालिका आयुवतांना आणि शहर अभियंता यांना पत्र लिहून त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच याचा गांभीर्याने विचार करुन प्राधान्याने योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
किल्ल्यावरील झेंडा जीर्णावस्थेत असल्याची माहिती मिळताच तो झेंडा त्वरित बदलून नवा झेंडा लावण्यात आला आहे.
-नितीन मुकणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
दीपोत्सव अंधारात...
घोडबंदर किल्ल्यावरील सर्व दिवे दिवाळी सणाच्या दिवसात बंद होते. किल्ल्यावर सर्वत्र काळोख पसरला होता. दिवाळीच्या दिवशी गडप्रेमी मावळे पणत्या लावण्यासाठी गेले होते. अंधारात तटबंदी बुरुजाची संरक्षण भिंत दिसत नसल्याने जीव मुठीत धरुन त्यांनी गडावर पणत्या लावल्या. पाय ठेवण्याचा अंदाज चुकला असता तर ते सरळ खाडीत पडले असते.
-रोहित सुवर्णा, अध्यक्ष, गड किल्ले संरक्षण-संवर्धन समिती.