‘ केडीएमसी'च्या पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या फेरीवाला कारवाई पथकावर स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्टेशन रोड वरील कारवाई दरम्यान संतप्त फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
यावेळी फेरीवाल्यांनी कारवाई पथकाला जोरदार विरोध करत जप्त केलेला माल आम्हाला परत द्या, अशी मागणी करत फेरीवाला पथकाचा पाठलाग केला. यात फेरीवाला हटाव पथक आणि फेरीवाले यांच्यात तु तु मै मै झाली.
प्राप्त माहिती नुसार १३ जून रोजी सायंकाळी क-प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्या फेरीवाला हटाव पथकाने कल्याण पश्चिम मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कल्याण स्टेशन रोड, स्काँय वाँक परिसरात फेरीवाला हटाव कारवाई केली. स्कायवॉक कारवाई नंतर परत आलेल्या महापालिका पथकास परत फेरीवाल्यांनी फुटपाथ व्यापत आपले बस्तान मांडलेले दिसल्याने, पथकाने फेरीवाल्यांवर जप्तीची कारवाई सुरु केली. या कारवाईत काही महिला फेरीवाल्यांनी आमच्या मालाचे नुकसान केले, अशी ओरड करीत तु तु मै, मै केली आणि आरेरावी करीत महिला सुरक्षा बलाच्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर धावून जात आक्रमक पवित्रा घेतला.
या संदर्भात सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी कारवाईला विरोध करणाऱ्या, तसेच फेरीवाला हटाव पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या आंगावर धावून जाणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली. प्रशासनाच्या कारवाई बडग्यामुळे संतप्त फेरीवाल्यांनी महापालिका मुख्यालय गाठले. यावेळी सुरक्षारक्षकाने प्रवेशद्वार बंद केल्याने संतप्त फेरीवाले प्रवेशद्वाराबाहेर जमले. आमचा जप्त केलेला माल परत केला नाही तर आम्ही याच ठिकाणी आमच्या जीवाचे बरे वाईट करुन घेऊ, असा इशारा दिला. कारवाई पथकाने आमचा माल जप्त करुन आम्हाला मारहाण केल्याचा आरोप करत यावेळी फेरीवाल्यांनी गादारोळ घातला, असेही समजते.
दरम्यान, स्टेशन परिसरातील १५० मीटर परिसर फेरीवाला मुक्त परिसर असावा, यासाठी फेरीवाला हटाव पथकाने कारवाईचा बडगा उगारला तरी समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. स्टेशन परिसरातील रस्त्यालगत पार्क केलेल्या दुचाकी, फेरीवाला बस्तान आणि या सर्वातून अडथळ्यांची शर्यत पार करीत ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना कधी, कसा दिलासा मिळेल? असे चित्र बदलणार कधी? असा मुद्दा यानिमित्ताने चर्चिला जात आहे.