दशकभर रखडलेला सानपाडा-तुर्भे पादचारी पूल अखेर पादचाऱ्यांसाठी खुला
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्ग ओलांडण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला आणि सानपाडा-तुर्भे विभागाला जोडणारा पादचारी पूल अखेर पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत खुला करण्यात आला आहे. गेल्या १० वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असलेल्या सानपाडा-तुर्भे पादचारी पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी २०१८ पासून शासन दरबारी अथक पत्रव्यवहार केला होता. अखेर निलेश कचरे यांच्या पाठपुराव्याला यश येऊन सानपाडा-तुर्भे पादचारी पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याने पादचारी पूल अभावी सायन-पनवेल महामार्ग जीव मुठीत धरुन ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
सानपाडा-तुर्भे पादचारी पुलाचे काम गेल्या १० वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने सानपाडा-तुर्भे दरम्यान ये-जा करणारे नागरिक जीव मुठीत धरुन सायन-पनवेल महामार्ग ओलांडत होते. सदर बाब गांभीर्याने घेऊन सानपाडा-तुर्भे पादचारी पुलाचे काम पूर्ण होऊन पादचाऱ्यांना महत्त्वाची सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता समाजसेवक निलेश सोमाजी कचरे यांनी सन-२०१८ पासून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तुर्भे विभाग अधिकाऱ्यांशी सातत्याने पत्रव्यवहार करुन तसेच नियमित संपर्क साधून सानपाडा-तुर्भे पादचारी पुलाअभावी नागरिकांची होणारी गैरसोय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. अखेर निलेश कचरे यांनी शासन दरबारी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे अर्धवट स्थितीतील सानपाडा-तुर्भे पादचारी पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी १,५०,१३,१४०/- रुपये (एक कोटी पन्नास लाख तेरा हजार एकशेचाळीस रुपये) निधी मंजूर झाला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे विशेषतः तुर्भे विभाग कार्यकारी अभियंता आणि त्यांच्या पथकाने योग्य नियोजन, गुणवत्ता आणि वेळेचे भान ठेवून नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक असलेली सानपाडा-तुर्भे पादचारी पुलाची सुविधा केवळ १० महिन्यांमध्ये उभी केली.
अर्धवट अवस्थेत असलेला सानपाडा-तुर्भे पादचारी पूल नागरिकांसाठी एक संकट होता. सायन-पनवेल महामार्गावरील वेगवान वाहनांची वर्दळ, अपुरे सिग्नलिंग आणि अडथळ्यांमुळे महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी, वयोवृध्द, दिव्यांग व्यक्ती आणि कामावर जाणारे नागरिक यांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत होता. नागरिक सायन-पनवेल महामार्ग ओलांडताना काही वेळा अपघाताच्या जीवघेण्या घटना देखील घडल्या आहेत. आता सानपाडा-तुर्भे पादचारी पूल पूर्ण स्वरुपात कार्यान्वित झाल्यामुळे नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. या पादचारी पुलामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटला आहे, असे निलेश कचरे यांनी नमूद केले.
अर्धवट सानपाडा-तुर्भे पादचारी पूल पूर्ण होण्याची, आम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतो. सानपाडा-तुर्भे पादचारी पूल पूर्ण होऊन नागरिकांसाठी खुला झाल्याने आता मुले-मुली शाळेत सुरक्षितपणे जातात, वृध्द लोक आरामात चालतात. निलेश कचरे यांनी खरेच जनतेचा आवाज शासन दरबारी पोहोचवल्यानेच आता तुर्भे-सानपाडा भागातील नागरिकांची जीव मुठीत धरुन सायन-पनवेल महामार्ग ओलांडण्यातून सुटका झाली आहे. - मंगेश कदम, स्थानिक रहिवाशी - तुर्भे.
सानपाडा-तुर्भे पादचारी पूल म्हणजे केवळ एक संरचना नाही, तर जनतेच्या सुरक्षेची हमी आहे. नागरिकांचे आयुष्य सुलभ करणे हेच आपले ध्येय आहे. या संपूर्ण प्रकल्पामुळे केवळ वाहतुकीची समस्या सुटली नाही, तर एक सकारात्मक शासन-नागरिक संवादाचे उदाहरणही उभे राहिले आहे. - निलेश कचरे, सामाजिक कार्यकर्ते - सानपाडा, नवी मुंबई.