‘व्हर्टिकल गार्डन'ची संकल्पना रद्द

वाशी : शहर सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई शहर अव्वलस्थानी यावे, यासाठी नवी मुंबई शहरात स्वच्छतेबरोबरच सुशोभीकरणावरही भर दिला जात आहे. मात्र, नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेमध्ये बाधा ठरणाऱ्या ‘व्हर्टिकल गार्डन'ची संकल्पना रद्द होऊन देखील ‘व्हर्टिकल गार्डन'चे सुकलेले स्टॅन्ड धूळखात पडले आहेत. त्यामुळे सदर स्टँड काढण्याची मागणी आता पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.

‘निश्चय केला, नंबर पहिला', असा दृढ निश्चय करत नवी मुंबई महापालिका ‘स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत दरवर्षी नव नवीन संकल्पना राबवत असते. त्याच अनुषंगाने महापालिकेने नवी मुंबई शहरात ‘व्हर्टिकल गार्डन' (भिंत उद्यान) उभारले होते. दरवर्षी या ‘गार्डन'वर प्रत्येकी २ ते ९ लाख खर्च होत होतो. मात्र, सदर ‘व्हर्टिकल गार्डन' उभे केल्यानंतर त्याची देखभाल-दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. याशिवाय ‘नवीन वर्षी पुन्हा त्याच जागी नवीन गार्डन उभे करायचे', असा एक कलमी कार्यक्रम काही महापालिका अधिकाऱ्यांनी राबवला होता. त्यामुळे ‘व्हर्टिकल गार्डन' सुकून महापालिकेचा पैसा वाया जात असल्याचे निदर्शनास आल्यानंत तत्कालीन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ‘व्हर्टिकल गार्डन' संकल्पना रद्द केली. मात्र, मागील वर्षी उभारलेल्या ‘व्हर्टिकल गार्डन' मधील झाडे देखभाली अभावी सुकून फक्त स्टॅन्ड मध्ये रिकाम्या कुंड्या शिल्लक राहिल्याचे चित्र सध्या दिसत आहे. परिणामी सुंदर दिसणाऱ्या या उद्यानांच्या जागा भकास वाटू लागल्या आहेत. त्यामुळे भकास दिसणारे ‘व्हर्टिकल गार्डन्स'चे स्टँड काढण्याची मागणी आता सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी मार्केट मध्ये अनधिकृत व्यापार