‘सिडको'चे निवासी भूखंड लवकरच फ्री होल्ड
नवी मुंबईः ‘सिडको'तर्फे रहिवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर (लीजहोल्ड) वाटप केलेल्या जमिनी कब्जेहक्कामध्ये (फ्री होल्ड) रुपांतरीत करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. सदर निर्देशानुसार प्रामुख्याने निवासी भूखंडांचे प्रÀी-होल्डमध्ये रुपांतर करण्यासाठी येणाऱ्या अर्जांची छाननी करण्याकरिता ‘सिडको'तर्फे समिती गठीत करण्यात आली आहे.
सदर योजना निविदा प्रक्रियेने, ‘सिडको'मार्फत बांधण्यात आलेले गृहप्रकल्प तथा १२.५ टक्के आणि २२.५ टक्के योजना अंतर्गत वाटपित करण्यात आलेल्या निवासी भूखंडांकरिता लागू राहील. त्याअनुषंगाने सर्व निवासी मालमत्ता भूधारकांनी अर्ज केल्यावर निश्चित केलेले रुपांतर शुल्क भरल्यानंतर कब्जेहक्कामध्ये रुपांतरीत करता येईल.
ज्या भूखंडाच्या करारनाम्यामध्ये अनर्जित उत्पन्नाचा भरणा करण्याबाबत उल्लेख आहे, अशा भूखंडांना निश्चित केलेल्या रुपांतर शुल्कासह विहित अनर्जित रक्कमेचा भरणा करावा लागेल. अनुदानित, सवलतीच्या दराने वाटप केलेल्या भूखंडांचे निश्चित केलेल्या रुपांतर शुल्काव्यतिरिक्त इतर निश्चित केलेले शुल्क वसूल करुन कब्जेहक्कामध्ये रुपांतरीत करण्यात येईल, असे ‘सिडको'तर्फे सांगण्यात आले.
सदर योजना ऐच्छिक असून भाडेपट्टाविलेख (लिजडीड) झालेल्या भूखंडांनाच लागू राहील. भूखंडाचे कब्जेहक्कामध्ये रुपांतर झाल्यानंतर मालमत्तेच्या विक्री अथवा हस्तांतरणाकरिता ‘सिडको'तर्फे हस्तांतरण शुल्क आकारले जाणार नाही. कब्जेहक्कामध्ये रुपांतर झालेल्या भूखंडाच्या अधिकार अभिलेखाची नोंद आणि अद्ययावतीकरण भूमी अभिलेख विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे करण्यात येईल. त्यामुळे सदर योजनेचा पुरपूर फायदा घ्यावा, असे आवाहन ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले आहे.