आरोग्यप्रेमी नागरिकांच्या उत्साही सहभागातून नवी मुंबईत योग दिन यशस्वी

नवी मुंबई : ‘स्वच्छतेतून आरोग्य, आरोग्यासाठी योग' या सूत्रावर आधारित योगविषयक विशेष कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महारपालिकेच्या वतीने सिडको आणि द आर्ट ऑफ लिव्हींग यांच्या सहयोगाने वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात आयोजित करण्यात आले होते. अत्यंत भव्यतम स्वरूपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विविध वयोगटातील ५ हजारहून नागरिकांनी सहभागी होत सदरचा उपक्रम यशस्वी केला.

याप्रसंगी राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन'चे युथ आयकॉन आंतराष्ट्रीय जलतरणपटू शुभम वनमाळी, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या शिलादिदी, माजी उपमहापौर अनिल कौशिक, राजू शिंदे, रेखा चौधरी, द आर्ट ऑफ लिव्हींगचे हनुमंत शिंदे, योग प्रशिक्षक प्रमोद कोकणे, दिप्ती देशपांडे  तसेच महापालिकेचे विभागप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या धावपळीच्या जीवनात शरीराची व मनाची संपन्नता वाढविणारा योग हा आपल्या दररोजच्या जीवनशैलीचा एक भाग व्हायला हवा असे योगाचे महत्व सांगत वनमंत्री गणेश नाईक यांनी माणसाचे मन शुध्द आणि संतुलित करणा-या योगाचे महत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक योग दिनाच्या माध्यमातून जगभरात वृध्दींगत केले असे सांगितले.

आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रेरणेतून मागील ११ वर्षांपासून सातत्याने योगविषयक कार्यक्रमाचे नवी मुंबईत आयोजन केले जात असल्याचा आनंद व्यक्त करीत आजच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्साह बघता नव्या पिढीतही योग परंपरा रूजत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

विशेष म्हणजे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांसह योगक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. द ऑर्ट ऑफ लिव्हींगच्या प्रशिक्षकांनी अगदी सहजसोप्या पध्दतीने योगक्रिया करून घेतल्या. तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या शिलादिदी यांनी मनःशांतीची प्रात्यक्षिके करून घेतली. तसेच केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाची वस्त्र समिती आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त सहयोगाने राबविल्या जाणा-या वस्त्र पुनर्निर्माण सुविधा केंद्राव्दारे टाकाऊ कपड्यापासून पुनर्निर्मिती केलेल्या विशेष योगा मॅटवर मंत्री, आयुक्त आणि इतर मान्यवरांनी योगासने केली. यावेळी योगविद्येचे लाभ लिहिलेले वस्त्र तुकडे जोडलेली पुनर्निर्मित गोधडी प्रदर्शित करण्यात आली होती.

दरम्यान, यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन ‘एक पृथ्वी, एक आरोग्य, यासाठी योग या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात येत असल्याने स्वच्छ शहर असा नावलौकिक असणा-या नवी मुंबईने स्वच्छता, आरोग्य आणि योग या त्रिसूत्रीचे महत्व अधोरेखित करीत आरोग्यप्रेमी नागरिकांनी एकत्र येत अत्यंत उत्साहाने आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला. 

Read Previous

क्लाऊड नाईन रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

Read Next

नेत्र चिकित्सकांच्या निष्काळजी उपचारामुळे अनेक रुग्णांना 'सुडोमोनास' संसर्ग; डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल