श्रीमूर्ती विसर्जनासाठी १४३ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती
नवी मुंबई : संपूर्ण जगभरात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवास ‘राज्य महोत्सव' घोषित करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या मनातील गणेशोत्सवाची महती अधोरेखित केली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीनेही श्रीगणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम, कार्यक्रम तसेच सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धांचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे.
वातावरणाचे बदलते स्वरुप लक्षात घेऊन गणेशोत्सवासारखा सर्वस्पर्शी उत्सवही पर्यावरणाची जपणूक करीत साजरा व्हावा या भूमिकेतून आयुक्त डा. शिंदे यांनी ‘पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव' साजरा करावा, असे आवाहन नागरिकांना मागील महिन्यापासून सातत्याने नागरिकांना केले आहे. आयुवतांच्या या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
नागरिकांनी पर्यावरणाची जपणूक करण्याच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची प्रतिष्ठापना न करता पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. श्रीमूर्तींचे विसर्जन नैसर्गिंक जलस्त्रोतात न करता महापालिकेने ठिकठिकाणी मोठ्या संख्येने निर्माण केलेल्या १४३ कृत्रिम विसर्जन तलावांपैकी आपल्या घराजवळील कृत्रिम विसर्जन तलावात करावे, असे आवाहन महापालिका मार्फत करण्यात आलेले आहे. महत्वाचे म्हणजे न्यायालयाच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ६ फुटापेक्षा कमी उंचीच्या श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावयाचे आहे.
याशिवाय श्रीगणेशोत्सवाच्या सजावटीत प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळून कापड, कागद अशा पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करावा. तसेच कर्णकर्कश्य ध्वनी टाळून मर्यादित आवाजात वाद्यांचा वापर करावा आणि लेझर लाईटचा वापर टाळावा, असेही आवाहन करण्यात आलेले आहे.
श्रीगणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नसून मंडप परवानगीसाठी एक खिडकी स्वरुपात संगणकीय ऑनलाईन ई-सेवा उपलब्ध करुन दिल्याने मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे.
इकोफ्रेन्डली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे मंडळांना आवाहन करताना श्रीगणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ विसर्जनस्थळे उपलब्ध व्हावीत याची खबरदारी घेत मागील वर्षीपेक्षा वाढ करीत १४३ इतक्या मोठ्या प्रमाणावर कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. या कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ आणि अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित करण्यात आल्या असून त्याठिकाणी कृत्रिम तलाव उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये बेलापूर विभागात २०, नेरुळ २६, वाशी १६, तुर्भे २१, कोपरखैरणे १६, घणसोली १६, ऐरोली १८ आणि दिघा विभागात १० अशाप्रकारे एकूण १४३ कृत्रिम विसर्जन तलाव उभारले जात आहेत. नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या श्रीमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावयाचे असून पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत मोठ्या मूर्तींसाठीही प्राधान्याने कृत्रिम विसर्जन तलावांचाच वापर करावा, असे आवाहन विविध माध्यमांतून करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात २२ पारंपारिक विर्सजन स्थळे असून त्याठिकाणी होणारी भाविकांची गर्दी विभागली जावी आणि एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता मागील काही वर्षांपासून कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. कृत्रिम तलावांमुळे नैसर्गिक जलस्तोतांतील जलप्रदुषणाला प्रतिबंध होऊन त्यांचे प्रदुषण कमी होत असते. नवी मुंबई स्वच्छ शहराप्रमाणेच पर्यावरणशील शहर म्हणून नावाजले जात असून या इतक्या मोठ्या संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमुळे पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीने सकारात्मक यशस्वी पाऊल उचलले जात आहे. या कृत्रिम तलाव संकल्पनेला दरवर्षी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे.
नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांमार्फत विसर्जन व्यवस्था सुसज्ज असणार असून स्वयंसेवक, जीवरक्षक, अग्निशामक यांचेसह विद्युत, सीसीटिव्ही, आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, निर्माल्य वाहतूक अशा सर्व सुविधा तसेच तराफे, फोर्कलिपट अशी यंत्रसामुग्री सुसज्ज असणार आहे. नवी मुंबई महापालिका आणि पोलीस विभागाने गणरायाचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सुयोग्य नियोजन केलेले आहे.
पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी श्रीमूर्ती शाडुची आणि पर्यावरणपूरक असेल याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे श्रीमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे अथवा नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी करावे. पर्यावरणशील इकोफ्रेन्डली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करावा.
- डॉ.कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.