सीवूड्स मधील डांबरीकरण केलेला रस्ता फक्त पंधरा दिवसात खराब;... सीवूड्स सेक्टर-३० मधील नवीन बांधलेल्या शाळेत स्लॅब पडला
नवी मुंबई : सीवूड्स मध्ये रेल्वे स्थानक ब्रिज ते सेक्टर-५०(नवीन), रेल्वे स्थानक ब्रिज ते पाम बीच, सावळा हॉस्पिटल ते आदर्श मार्केट रस्त्याचे नुकतेच करोडो रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आले. परंतु केवळ १५ दिवसात सदर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सदर रस्त्याची खडी निघाली आहे. त्यामुळे कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे स्पष्ट दिसून येते. सदर काम केलेल्या मे. जॅक इन्फ्रास्ट्रॅक्चर या कंत्राटदाराबद्दल मनसेने या अगोदर देखील आंदोलन केले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी सदर कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सदर कंत्राटदारास पुन्हा काम देण्यात आले. ही गंभीर बाब आहे. चर्चे दरम्यान कार्यकारी अभियंता यांनी कंत्राटदाराची बाजू घेतली असता मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर बसून ठिय्या आंदोलन केले. अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युती बद्दल मनसेने एक विडंबनात्मक कविता बनवली आहे. तसेच ज्या रस्त्यावर डांबर कमी आणि खडी जास्त होती. त्या खराब रस्त्यावरील खडी गोळा करून अधिकाऱ्यांना भेट दिली. त्याच प्रमाणे नेरुळ, सेक्टर-३० मधील नवीन बांधकाम केलेल्या शाळेचे स्लॅब शाळा सुरु झाल्यावर केवळ दहा दिवसात पडते. यावरून पालिका किती निकृष्ट दर्जाचे काम करते हे दिसून आले. या कामाचा जाब ही अधिकाऱ्यांना विचारण्यात आला.
सदर रस्त्याचे व शाळेच्या बांधकामाचे स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांनी नीट परीक्षण न केल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर दोन्ही कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा व त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मनसे शहर सचिव सचिन कदम यांनी दिली. मनसेच्याआक्रमक पवित्र्या नंतर कार्यकारी अभियंता यांनी मान्य केले की सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच त्याच्या कडून काम पुन्हा करून घेण्यात येणार आहे आणि त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे यांनी दिले. तसेच शाळेचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्या मे. मनोज इंटरप्राईझ याच्या कामाचे स्ट्रॅक्चरल ऑडिट करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. संबंधित दोषी अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन आणि दोन्ही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले नाही तर मनसे याहून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा सचिन कदम यांनी दिला.
मनसेच्या शिष्टमंडळात सचिन कदम यांच्या बरोबर मनसे उप विभागअध्यक्ष सुनिल शिंदे, शाखाअध्यक्ष दिलीप पाटील, संदीप कांबळे, मनविसे विभाग सचिव शंकर घोंगडे-पाटील, महाराष्ट्र सैनिक राजेश शिर्के, संतोष गायकवाड, अमित चिले हे उपस्थित होते.