हातात कोंबड्या घेऊन कॉंग्रेससह खाटिक समाजाची केडीएमसी मुख्यालयाबाहेर निदर्शने
कल्याण : संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष वेधणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 15 ऑगस्ट रोजी मांस विक्री बंदीच्या निर्णयाविरोधात आज कॉंग्रेस पक्षासह खाटिक समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि खाटिक समाजाच्या प्रतिनिधींनी हातामध्ये कोंबड्या घेऊन केडीएमसीच्या या निर्णयाचा विरोध केला.
15 ऑगस्ट रोजी मांसविक्री बंदीच्या केडीएमसीने घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. हिंदू खाटिक समाजाने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत आजच्या 15 ऑगस्ट रोजी केडीएमसी मुख्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. तर या तीव्र विरोधानंतरही केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहत कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय बदलणार नसल्याचे दोनच दिवसांपूर्वी स्पष्ट केले.
या सर्व पार्श्वभूमीवर हिंदू खाटिक समाजाने आणि काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी आज आंदोलनाचा इशारा दिला होता. परिणामी झेंडावंदन झाल्यानंतर आज सकाळपासूनच केडीएमसी मुख्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तर खबरबदारीचा उपाय म्हणून शंकरराव चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा आणि तिकडून इकडे येणारे दोन्ही मुख्य रस्ते पोलिसांनी बॅरिकेट लावून बंद केले होते. दरम्यान सुरुवातीला खाटिक समाजाच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी अचानक केडीएमसी मुख्यालयाबाहेर धडक देत निदर्शने केली. हातामध्ये कोंबड्या घेत त्यांनी केडीएमसीच्या या निर्णयाचा विरोध केला. या सर्व आंदोलकांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले.
तर त्यांच्यापाठोपाठ कल्याण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नवीन सिंग, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, राजभाऊ पातकर, शकील खान, प्रवीण साळवे आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून केडीएमसीकडे येणाऱ्या मार्गावर आंदोलन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही हातामध्ये कोंबड्या घेऊन केडीएमसीच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर हा निर्णय म्हणजे लोकशाहीची गळचेपी असून आम्ही आमच्या स्वातंत्र्यावरील येणारी बंधने अजिबात सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी सचिन पोटे यांनी दिली.