स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा चिखलातून प्रवास
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खंबाळा ग्रामपंचायत हद्दीतील राऊत पाड्यातील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षीच्या उंबरठ्यावरही खडतर प्रवास सुरुच असून ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना चिखलातून वाढ काढावी लागत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमधून संबंधित प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात असून डांबरी किंवा काँक्रिटीकरणाची पायवाट करण्याची मागणी केली जात आहे.
त्यानुषंगाने येथील राऊत पाड्यात २०० हून अधिक नागरी वस्ती आहे. दरम्यान, राऊत पाडा ग्रुप ग्रामपंचायत खंबाळा आणि दाभाड या २ ग्रामपंचायत हद्दीत येत आहे. तर या पाड्यातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मुख्य रस्ता दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतून जात आहे. परंतु, काही शेतकऱ्यांच्या जागा या कच्च्या चिख्खल पायवाट रस्त्यामध्ये येत आहे. त्यामुळे ते शेतकरी रस्ता बांधकामासाठी मज्जाव करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे खंबाळा, दाभाड ग्रामपंचायत प्रशासनाने राऊत पाड्यातील रस्ता व्हावा याकरिता यासाठी भिवंडी तहसीलदार कार्यालयात लेखी निवेदनाद्वारे प्रस्ताव सादर केला आहे.
ग्रामपंचायतीच्या निवेदनानुसार राऊत पाडा, परशुराम पाड्याकरिता रस्ता पिढीजात वहिवाटीचा असून सदर रस्ता तातडीने तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सदर रस्ता तात्काळ न बनवल्यास राऊत पाड्यातील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. त्यामुळे येत्या स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्षी तरी राऊत पाड्यातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांची चिखलातील वाट मोकळी होणार का? याकडे येथील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.