वादळी वाऱ्यासह अवकाळीचा कहर
भिवंडी : भिवंडी मध्ये ४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास अचानकपणे वातावरणात बदल होवून वादळी वाऱ्यासह जोरदार कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे पडघा हद्दीत सायंकाळी ३.४५च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळीचा कहर पहायला मिळाला.
यावेळी पडघा ते वडपे आदि भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वाहन चालकांची एकच दैना उडाल्याने चालकांना वाहने चालवताना चांगलीच कसरत करावी लागली होती. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक संथगतीने सुरु होती. तर भिवंडी शहरातही तुफान वादळी वाऱ्यामुळे डोंगर क्षेत्रातील भागात अनेक घरांचे पत्रेही उडाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील डोंगराळ भागातील नुरीनगर, रामनगर, गायत्रीनगर सारख्या अनेक डोंगरांवरील भागातील घरांचे पत्रे उडाले आहेत.
या दुर्घटनेची माहिती भिवंडी महापालिका आपत्कालीन विभागाला मिळताच आपत्कालीन विभाग प्रमुख साकिब खरबे यांनी पथकासह नागरिकांच्या मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. याचप्रमाणे भिवंडीतील ग्रामीण मधील लाखिवली गावातही वादळी वाऱ्याचा असाच फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. लाखिवली गांवचे रहिवाशी चंद्रकांत पाटील यांच्या घराचे पत्रे वाऱ्यामुळे पूर्णपणे उचकटून नुकसान झाले आहे. त्यामुळे घरातील नागरिक रस्त्यावर आल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. तर सुदैवाने नाशिकच्या दिशेने आलेला वादळी, वारा आणि पावसाच्या प्रवाहाचा ओघ भिवंडीत कमी झाली. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची अधिक तारांबळ न उडता वीटभट्टी व्यावसायिकांसह रब्बी शेती करणारे शेतकरीही नुकसानी पासून बचावले आहेत.
दरम्यान, अचानकपणे बदललेल्या वातावरणामुळे ऐन उकाड्यात काही काळासाठी हवेत गारवा निर्माण झाला होता.