खड्डे भरण्याचे काम युध्दपातळीवर -शहर अभियंता परदेशी

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरात ठिकठिकाणी, विशेषतः डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली असून सदर खड्डे भरण्याचे काम युध्दपातळीवर केले जाणार असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली मधील सर्वच रस्ते टप्प्याटप्याने सिमेंट काँक्रीटचे करण्याचे काम सुरु असून तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही परदेशी यांनी केले आहे.

यंदा चक्क १० मे पासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच गेल्या आठवड्याभरापासून किंवा त्याहीपेक्षा अधिक दिवसांपासून कल्याण, डोंबिवली शहरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. परिणामी, सिमेंट काँक्रीटीकरण न झालेल्या डांबरी रस्त्यांवर काही प्रमाणात खड्डे पडले असून त्याचा नागरिकांनाही मोठा त्रास होत आहे. ‘केडीएमसी'च्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची वस्तुस्थिती मान्य केली. या डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम वेगाने केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या पावसाचा जोर वाढलेला असल्याने रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी कोल्ड मिक्स, स्टोन क्रश आदि पध्दत वापरण्यात येत असून दुरुस्ती तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार असल्याचेही अनिता परदेशी यांनी सांगितले.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली शहरातील सर्वच प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले जाणार असून त्यापैकी काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आली असल्याचे सांगत येत्या काळात टप्प्याटप्प्याने सर्वच रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे काम सुरु असल्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही शहर अभियंता अनिता परदेशी यांनी केले आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पलावा पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे