खासदार निधीतून उभारलेली सरकारी जिम बंद
आमरण उपोषण करण्याचा सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांचा इशारा
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर-५ मध्ये नवी मुंबई महापालिका भूखंडावर खासदार निधीतून ५७ लाख खर्च करुन २०१९ साली उभारण्यात आलेली शासकीय व्यायामशाळा गेल्या ६ वर्षांपासून बंद आहे. विशेष म्हणजे सानपाडा सेक्टर-५ मध्ये खासदार निधीतून उभारलेली सरकारी व्यायामशाळा त्वरित सुरु करुन सामान्य नागरिकांसाठी खुली करावी, अशी मागणी सानपाडा मधील सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाजी कचरे यांनी २०२२ पासून सातत्याने महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मात्र, अद्याप निलेश कचरे यांच्या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसांमध्ये सानपाडा सेक्टर-५ मध्ये खासदार निधीतून उभारलेली सरकारी व्यायामशाळा सुरु करुन सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निलेश कचरे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
सानपाडा सेक्टर-५ मध्ये खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या सरकारी व्यायामशाळेचे लोकार्पण तत्कालीन मंत्री, महापौर, आयुक्त, आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. परंतु, या जिममध्ये कोणतेही कार्यक्षम साहित्य नाही, संपूर्ण ठिकाणी अस्वच्छता आहे.या व्यायामशाळेचा गैरवापर होत असून, व्यायामशाळा खाली उभारलेला सभा मंडप कोण वापरतो हेही नागरिकांना माहिती नाही. सदर व्यायामशाळा चालविण्यासाठी करार केलेल्या संस्थेने व्यायामशाळा नागरिकांसाठी कधीच खुली केली नाही.नुकतीच सानपाडा सेक्टर-४ मधील ‘फिजिक्स जिम' नावाची व्यायामशाळा अचानक बंद करण्यात आली असून, जिम मालक आणि चालक कोणतीही पूर्वसूचना न देता फरार झाला आहे. फक्त ‘फिजिक्स जिम'च नव्हे तर सानपाडा प्रभागातील यापूर्वीही अराईज फिटनेस या जिमसह इतर २ व्यायामशाळा चालक नागरिकांना फसवून फरार झाले आहेत. अचानक बंद करण्यात आलेली फिजिक्स जिम सानपाडा मधील बंद करण्यात आलेली चौथी जिम आहे. या सर्व घटनांमध्ये नागरिकांचे एकूण लाखो रुपये बुडाले असून, जिम अचानक बंद करण्यात आल्याने युवकांचे आरोग्य, शारीरिक विकास आणि मानसिक विश्वास यावर या घटनांचा मोठा परिणाम झालेला आहे, असे सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी नवी मुंबई महापालिका आयुवतांना दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.
सानपाडा सेवटर-५ मध्ये खासदार निधीतून उभारलेली सरकारी व्यायामशाळा त्वरित सुरू करुन सामान्य नागरिकांसाठी खुली करावी, जिम चालवण्यासाठी करार केलेल्या संस्थेने उद्दिष्टांनुसार सेवा न दिल्यामुळे सदर करार तत्काळ रद्द करण्यात यावा, व्यायामशाळा खाली उभारलेल्या सभा मंडपाचा वापर कोण करतो याचा खुलासा त्वरित करण्यात यावा आणि खाजगी जिम चालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन नुकसानग्रस्त नागरिकांना न्याय द्यावा, आदी प्रमुख चार मागण्या निलेश कचरे यांनी नवी मुंबई महापालिका आयुवतांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. पुढील १५ दिवसांत मागणी मान्य केली नाही, तर स्वतः आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही निलेश कचरे यांनी निवेदनात दिला आहे.
सानपाडा सेक्टर-५ मध्ये खासदार निधीतून उभारण्यात आलेली व्यायामशाळा सामान्य नागरिकांसाठी खुली करावी, या मागणीसाठी २०२२ पासून सातत्याने महापालिका, आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे १०० पेक्षा अधिक वेळा पत्रव्यवहार केला आहे, निवेदने दिली आहेत. व्यायामशाळा नागरिकांच्या आरोग्याच्या मूलभूत हक्काशी निगडित आहे. मात्र, अजूनही व्यायामशाळा सुरु करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.- निलेश कचरे, सामाजिक कार्यकर्ता, सानपाडा , नवी मुंबई.