टेक, मेक, डिस्पोज आणि पुन्हा मेक
नवी मुंबई : वर्तमानात कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या वस्तूंपासून नवीन वस्तू तयार करून परत त्यांचा वापर केल्यानंतर परत कचऱ्यात फेकून देण्यापेक्षा त्यातून नवीन वस्तू तयार केली जाऊ शकते, त्यासाठी टेक, मेक, डिस्पोजल व परत एकदा मेक असा वेगळा विचार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी डॉ. डी वाय पाटील विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणातील अर्थशास्त्र या पर्यावरण विषयक परिषदेत व्यक्त केला. पर्यावरण संवर्धनाची व रक्षणाची सुरुवात आपण प्रत्येकाने स्वतःपासून करायला हवी या जबाबदारीचे भान नवीन पिढीने ओळखायला हवं, असं सिद्धेश कदम म्हणाले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि डी वाय पाटील विद्यापीठ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने टाऊन हॉल, सेंटर ऑफ एक्सलन्स, डी वाय पाटील विद्यापीठ नेरूळ येथे पर्यावरणातील अर्थशास्त्र या विषयाची एक दिवसाची कार्यशाळा 11एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सिद्धेश कदम बोलत होते.
वर्तमानात बदलत्या पर्यावरणाचा मानवी जीवनावर होणारा अयोग्य परिणाम लक्षात घेता माणसाने सवयींमध्ये बदल केला तर निश्चितच आपण सभोवतालच्या पर्यावरणाचे, प्रदूषणाचे प्रश्न निश्चित काही अंशी कमी करू शकतो, याकरिता तरुण पिढीने आणि नागरिकाने पुढाकार घेण्याची नितांत गरज सिद्धेश कदम यांनी व्यक्त केली.
सध्या प्रदूषणाचे काही प्रश्न जरी गंभीर असले तरी त्यात देखील अनेक संस्था पुढाकार घेऊन फेकून देणाऱ्या गोष्टींमधून नवीन गोष्टींची निर्मिती करीत आहेत याकरता जालना आणि जळगाव या ठिकाणच्या काही प्रमुख आस्थापनांची उदाहरणं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. समाजात प्रदूषण विषयक प्रश्नांबाबत काही व्यक्ती अथवा संस्था अतिशय कठोर मेहनतीतून नवीन नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहेत आणि प्रदूषणाचा स्तर कमी होण्यासाठी उद्योग क्षेत्रात नव्या जोमाने काम करीत आहेत, म्हणून अशा परिषदातून जे उत्तम काम करतात त्यांची उदाहरणं दिली पाहिजे जेणेकरून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल अशी भावना डॉ. अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केली.
डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष व कुलगुरू डॉ.विजय पाटील यांनी आमचे विद्यापीठ पर्यावरण रक्षणात नेहमीच अग्रेसर असते आणि त्याच अनुषंगाने डी वाय पाटील विद्यापीठाने नव्याने उभारलेली संपूर्ण इमारत ही ग्रीन बिल्डिंग असून यात विजेचा कमीत कमी वापर करून सौरऊर्जेच्या माध्यमातून मिळणारी वीज या इमारतीत वापरली जाते. त्याचबरोबर ही इमारत ग्रीन बिल्डिंग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेली असून या इमारतीला आंतरराष्ट्रीय दर्जाची मानांकन मिळाली आहेत असे सांगितले.
अशा पद्धतीची ही हरित इमारत संपूर्ण भारतात एकमेव व्यावसायिक हरित इमारत विद्यापीठाने उभारली आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि अशाच पद्धतीने आपण समाजामध्ये नवीन आदर्श निर्माण करू शकतो असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पर्यावरण संवर्धनाबद्दल नवीन पिढीला सातत्याने जागृत करण्याची गरज असल्याचे मत डॉ. विजय पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
या परिषदेला मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील उद्योग आस्थापनांचे प्रतिनिधी, विविध महाविद्यालयातील तरुण आणि त्याचबरोबर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या परिषदेला इंद्रकांत झा आयआयटी मुंबई, अमरसिंग सेक्रेटरी जनरल मटेरियल रिसायकल असोसिएशन ऑफ इंडिया ,पर्यावरण क्षेत्रातील लेखिका व युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथून शिक्षण घेऊन डी वाय पाटील विद्यापीठात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या विश्वस्त राजलक्ष्मी पाटील , भूषण कापसे मुख्य कार्यकारी अधिकारी टेक्नो वेस्ट मॅनेजमेंट या प्रमुख मान्यवरांनी बहुमोल मार्गदर्शन केले.