पनवेल : सार्वजनिक गणेशोत्सव व्यवस्थितरित्या उत्साहात संपन्न होण्यासाठी नियोजन करण्याच्या हेतूने महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके नाट्यगृहात ५ ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी पनवेल महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना ऑनलाईन पध्दतीने परवाना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती प्रात्यक्षिकासह सादर करण्यात आली. तसेच पर्यावरणपूरक गणोशोत्सव स्पर्धा यावषियी माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस विभागाच्या वतीने विविध सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस मंगेश चितळे यांच्यासह परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त स्वरुप खारगे, शहर अभियंता संजय कटेकर, महापालिका कार्यक्षेत्रातील ६ पोलीस ठाण्यांचेे पोलीस निरीक्षक तसेच महापालिका अधिकारी, सिडको, महावितरण, गणेश मंडळांचे प्रतिनिधी, आदि उपस्थित होते.
उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप परवानगी घ्यावी. तसेच जाहिरात फलकांची परवानगी घेऊनच फलक लावावेत. त्याप्रमाणे ६ फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्ती महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित कराव्यात. ट्रॅफिकची समस्या सोडविण्यासाठी महापालिका रायगड सुरक्षा मंडळाकडून जादा रक्षक घेणार असल्याची माहिती आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली. त्याचबरोबरच निर्माल्य रथामध्ये गणेश मंडळांनी आपले निर्माल्य टाकण्याच्या सूचना आयुक्तांनी गणेश मंडळांना दिल्या. अपघात मुक्त आनंदाने सण साजरा करण्याच्या यादृष्टीने महापालिका तत्पर असल्याचे यावेळी आयुक्त चितळे यांनी सांगितले.
गणेश मंडळांनी गणेश मुर्तीची काळजी घेण्याच्या दृष्टीने स्वयंसेवक २४ तास मंडपामध्ये ठेवावेत. तसेच सीसीटिव्ही लाववेत. तसेच गणेश मंडळांनी आपल्या साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवण्यात यावा. नियमांचे काटेकोर पालन करुन गणेश मंडळांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी यावेळी केले.
सदर बैठकीमध्ये गणेशोत्सवाच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध विषयांवर देखील चर्चा करण्यात आली. यावेळी उपायुक्त स्वरुप खारगे यांनी पर्यावरणपूरक गणोशोत्सवासाठी तयार केलेल्या सप्तसूत्री तसेच पर्यावरणपूरक गणेश उत्सव स्पर्धेची माहिती उपस्थितांना दिली. सार्वजनिक गणेश मंडळे आणि घरगुती सजावट स्पर्धा, मूर्तीदान आणि कृत्रिम तलावामध्ये बाप्पाचे विसर्जन या महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याविषयी उपायुवत खारगे यांनी आवाहन केले.
यावेळी गणेश मंडळांनी गणेशोत्सव काळात त्यांना येणाऱ्या विविध समस्या तसेच गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीचा समारोप उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केला.
बैठकीच्या प्रास्ताविकामध्ये उपायुक्त रविकिरण घोडके यांनी शासनाच्या १५० दिवस कार्यक्रमांतर्गत गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन पध्दतीने एक खिडकी योजना अमंलात आणली असल्याचे सांगून यासाठी तयार केलेल्या ऑनलाईन प्रणालीची माहिती दिली. या प्रणालीनुसार वाहतूक पोलीस, पोलीस स्टेशन, अग्निशमन विभाग, मालमत्ता विभाग यांचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन प्रभाग समिती अ, ब, क, ड उपविभाग नावडे यांच्यामार्फत मंडप परवानगी देण्यात येणार आहे. या सर्वबाबी एकाच ठिकाणी होणार असल्याचे सांगितले. यासाठी महापालिकेने https://pandal.maharts.com/ वेबसाईट तयार केली असळन, गणेश मंडळांनी या वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन यावेळी घोडके यांनी केले.