काँक्रिटीकरण कामामुळे ठाणे-बेलापूर रस्त्याची एक मार्गिका आठवड्यासाठी पूर्णपणे बंद

वाशी : ठाणे-बेलापूर रस्त्यावर आयकीया जवळील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई वाहतूक पोलीस विभाग मार्फत ठाणे-बेलापूर महामार्गाच्या एका भागात आठवडाभर पूर्णपणे वाहतूक बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका द्वारे काँक्रिटीकरणाचे काम  केले जाणारे असल्याने ७ मे रोजी रात्री ९ पासून ठाणे-बेलापूर महामार्गाची एक मार्गिका बंद करण्यात आली असून, येत्या १४ मे रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत सदर रस्ता बंद असणार आहे.

नवी मुंबई वाहतूक विभागाच्या आदेशानुसार, ठाणे-बेलापूर महामार्गावर सविता केमिकल ते तुर्भे रेल्वे स्थानक पर्यंतचा भाग निर्दिष्ट एक आठवड्याच्या  कालावधीत सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या दरम्यान वाहनांचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी, वाहतूक विभाग तर्फे पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत. ‘हलक्या वाहनांची वाहतूक अग्निशमन दल सिग्नल (महापे) मार्गे वळवले जाणार असून, सदर हलवया वाहनांना वाशी सेक्टर- २६ एपीएमसी आणि पाम बीच रोडवरुन इच्छित ठिकाणी जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे. जड वाहनांसाठी दोन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या मार्गावर वाहनचालकांना अग्निशमन दल सिग्नल (महापे) पासून डावीकडे वळण घेऊन तुर्भे एमआयडीसी परिसरातून जावे लागणार आहे. जड वाहनांसाठी दुसऱ्या पर्यायात सविता केमिकल ब्रिजखाली डावीकडे वळण घेऊन तुर्भे एमआयडीसी मार्गाने पुढे जावे लागणार आहे.

दरम्यान, ठाणे-बेलापूर महामार्गावरील वाहतूक बदलला सहकार्य करुन गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन नवी मुंबई वाहतूक विभाग तर्फे वाहनचालकांना करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई मध्ये ‘खाद्यपदार्थ वाळवण संस्कृती' आजही कायम