‘नवरात्रौत्सव'साठी मूर्तीकारांची लगबग सुरु
पनवेल : पितृपक्ष सुरु झाल्यावर सर्वांना वेध लागतात, ते नवरात्रोत्सवाचे. घटस्थापनेला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, मूर्तीशाळेत मूर्तिकारांची लगबग होताना दिसू लागली आहे. २२ सप्टेंबर रोजी घरोघरी घटस्थापना होणार असून ९ दिवस दुर्गा, कालिका अशा रुपात देवी विराजमान होणार आहेत. यासाठी नवी मुंबईतील मूर्तीशाळेतही मूर्तीकारांची लगबग सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेन यंदा देवीच्या मूर्ती किमतीत २० ते २५ टक्क्यांनी दरवाढ झाल्याचे मूर्तीकारांकडून सांगण्यात येत आहे.
येत्या काही दिवसातच ‘नवरात्रौत्सव'ला सुरुवात होणार आहे. शहरातील अनेक भागात मूर्ती बनवण्याचे काम सुरु असून, देवीच्या मूर्ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आता कारागीर अधिक मेहनत घेत आहेत. त्यात पनवेल परिसरातील मूर्ती शाळेतील मूर्तीकार मूर्तीचे दुसऱ्या टप्प्यातील कामात रंगरंगोटी करण्यात व्यस्त दिसत आहेत. ‘गणेशोत्सव'नंतर फार कमी अवधीत देवीच्या मूर्ती घडवायची असते. देवी स्त्री रुप असल्याने डोळे, चेहरा, हास्य आदि कामे मूर्तीकारांना बारकाईने करावी लागतात. त्यानुसार सध्या देवीच्या मूर्तींना कृत्रिम पापण्या लावण्याचे तसेच हिऱ्याची सजावट कारागीर करीत आहेत.
घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या असून, सध्या मोठ्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. घटस्थापनेसह देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मूर्तीकारांकडून देवीच्या मूर्ती साकारण्याच्या काम गतीने केले जात आहे. साधारण ८ इंचापासून १२ फुटांपर्यंत देवी मूर्ती साकारण्यात येत आहेत. सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिकादेवी, महिषासुरिनी, माँ वैष्णवदेवी, भवानी, एकवीरा माता अशा विविध मूर्ती तयार करण्यात येत आहेत. दुर्गा देवीची सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्तीस जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
यंदा मूर्तीच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ...
मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, नारळाच्या काथ्या, मजुरी आदिंच्या किंमतीत वाढ झाल्याने यंदा मूर्तीचे भावही २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. नवरात्रोत्सव मंडळाकडून बुकींग सुरु झाली आहे. भाविकांच्या मागणीनुसार आदिशक्तीच्या मूर्ती घडवाव्या लागतात. उत्पादन खर्च वाढल्याने यंदा देवीच्या मूर्तीच्या किंमतींमध्ये वाढ झाली असून, ५०० रुपयांपासून ते ४० हजार रुपयांपर्यंत देवीच्या मूर्तींच्या किमती असल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे.