पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण-वातावरणीय बदल विभागाने वर्षभरातील सर्व सण-उत्सव पर्यावरणपूरक साजरे करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर सूचनांचे काटेकोर पालन करुन आपले सण-उत्सव निसर्गाला पूरक आणि भूमी, वायू, अग्नी, जल, आकाश या नैसर्गिक पंचतत्वांचे रक्षण-संर्वधन करुन साजरे करावयाचे आहेत. त्या अनुषंगाने यावर्षी २७ ऑगस्ट पासून श्रीगणेशोत्सवास प्रारंभ होत असून विघ्नहर्ता श्रीगणरायाचा उत्सव प्रदुषणाचे विघ्न दूर करुन पर्यावरणशील रितीने ‘इकोफ्रेंडली' साजरा करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. याकरिता काही बाबींचे पालन करणे अपेक्षित आहे.
श्रीगणेशमूर्ती चिकणमाती, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी), प्लास्टिक आणि सिमेंट यासारख्या साहित्यापासून बनवल्या जातात. या मूर्तींना सजवण्यासाठी बरेचदा विषारी रंगांचा वापर केला जातो. जेव्हा या मूर्तींचे विसर्जन केले जाते, तेव्हा सदर रंग आणि साहित्य पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही. परिणामी, पर्यावरणाचे प्रदुषण होते. त्याकरिता पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात यावी.
गणेशोत्सवातील सजावटीसाठी थर्माकोल शीटस् आणि प्लास्टिक वास्रुन बनविलेल्या अविघटनशील साहित्याचा पर्यावरणावर दीर्घकालीन प्रतिकुल परिणाम होतो. त्यामुळे सजावटीत थर्मोकोल आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळून कागद, पुठ्ठे आणि कापडाचा वापर करण्यात यावा.
यादृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या सीबीडी-बेलापूर येथील कपडा पुनर्वापर प्रकल्पाच्या ठिकाणी वापरलेल्या कपड्यापासून अत्यंत आकर्षक सजावट साहित्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या कापडी सजावट साहित्याचा वापर करुन नागरिक आपली सजावट अत्यंत आगळ्या-वेगळ्या पध्दतीने आकर्षक करु शकतात. सदर साहित्य नागरिकांना सहजपणे उपलब्ध व्हावे याकरिता नमुंमपा मुख्यालय तसेच आठही विभाग कार्यालयांमध्ये या साहित्याचे विशेष स्टॉल मांडण्यात आले आहेत. त्याचा नागरिकांनी पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा.
नवी मुंबई महापालिकेने नैसर्गिक जलस्त्रोतांचे प्रदुषण कमी करण्याकरिता विसर्जनासाठी सर्वच विभागात सार्वजनिक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केलेली आहे. नागरिकांनी जलप्रदुषण टाळण्यासाठी श्रीमूर्ती विसर्जनासाठी प्राधान्याने कृत्रिम तलावांचा वापर करावा. ६ फुट उंचीपेक्षा कमी उंचीच्या सर्व श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे. महापालिका आठही विभाग कार्यालय क्षेत्रात मैदाने, उद्याने, मोकळ्या जागा, मोठ्या सोसायट्या अशा सार्वजनिक स्वरुपाच्या विविध ठिकाणांवर मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करीत असते. श्रीमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे या जनजागृती कार्यात एक सामाजिक जबाबदारी म्हणून विविध स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी कृतीशील नागरिकांनी पुढाकार घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे ‘माझी वसुंधरा अभियान ५.०', ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२५' आणि ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण अभियान' या अंतर्गत प्लास्टिक आणि थर्मोकोलमुक्त, कचरामुक्त, प्रदुषणमुक्त, फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक (ग्रीन फेस्टिव्हल) सण-उत्सव साजरा करावा. उत्सव कालावधीत प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा. सण समारंभामध्ये टाकाऊ वस्तुंचा आणि पुनर्वापर करण्यायोग्य वस्तुंचा वापर जास्तीत जास्त करावा. पर्यावरणपूरक, प्रदुषणमुक्त ‘पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव' साजरा करावा.
- डॉ.कैलास शिंदे, आयुक्त नवी मुंबई महापालिका.