शाळेची भिंत कोसळून एका ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू तर दोन लहान मुले जखमी
कल्याण : केडीएमसी हद्दीतील अ प्रभाग क्षेत्रातील बल्याणी परिसरातील केबीके इंटरनँशनल खाजगी शाळेची भिंत कोसळल्याच्या घटनेत एका लहान मुलाचा मृत्यु तर दोन लहान मुले गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. यानिमित्ताने खाजगी शाळा बांधकाम प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसत आहे.
प्राप्त माहिती नुसार टिटवाळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बल्याणी परिसरातील एस के नगर जवळील केबीके इंटरनँशनल् या खाजगी शाळेची संरक्षक भिंत शुक्रवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास धोकादायक झालेली भिंत कोसळल्याच्या घटनेत शेजारील श्री कृपा चाळ परिसरातील लहान मुले खेळत होती. त्यापैकी अंशुकुमार सिंह 11वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. तसेच 10वर्षीय मुलगा अभिषेक साहानी, आणि 6 वर्षीय शोएब शेख हे गंभीर जखमी झाले. दोन्ही मुलावर रूग्णालयात उपचार सुरू असून घटनेत अंशुकुमार सिंह याचा दुर्दैवी मृत्यु झाल्याचे रूक्मिणीबाई रूग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेने बल्याणी परिसरातील केबिके शाळेजवळील चाळ परिसरात शोककळा पसरली. स्थानिक चाळकरी रहिवाशांनी यानिमित्ताने आरोप केला की, केबिके शाळेची संरक्षण भिंत धोकादायक झाली होती. या बाबत शाळाप्रशासनाला तक्रार केली होती. मात्र शाळा प्रशासनाने थातुरमातुर डागडुजी करीत दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली. या घटनेने खाजगी शाळा इमारत बांधकाम, संरक्षण भिंत प्रश्न ऐरणीवर आला आहे.