पिसवली मधील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक

कल्याण : कल्याण पूर्वेतील पिसवली गावातील तसेच रामवाडी, शांतीनगर, मल्हारनगर झोपडपट्टी परिसर येथील सांडपाणी वाहून नेण्यासाठी मुख्य मोठा नैसर्गिक नाला आहे. याठिकाणी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकाकडून नालेसफाई केली जाते. परंतु, सदर जमीन मिळकतीचे जागा मालक आणि बिल्डर यांनी कोणतीही अडचण नसताना तसेच महापालिका कार्यालयाकडून कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता स्वतःच्या मनमानीने या नाल्याचा प्रवाह मार्ग बदली केला. याबाबत केडीएमसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करुन देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ पिसवली येथील नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयावर धड देत उपोषणाचा इशारा दिला आहे.

बिल्डरने सदर नाल्याचा प्रवाही मार्ग करताना अगोदरपेक्षा नाल्याची रुंदी देखील खूपच लहान केली. त्यामुळे मनमानी कारभारामुळे मागच्यावर्षी धनश्री कॉलनी, गुरुनाथ कॉलनी, ज्योर्तिलींग कॉलनी मधील सुमारे ३०० ते ४०० घरात पावसाचे पाणी शिरुन पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी देखील नाला बंद केल्याने याठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत ‘केडीएमसी'कडे पत्रव्यवहार करुन देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली.

दरम्यान, येथील जुना नैसर्गिक नाल्याचे योग्यरित्या कायमस्वरुपी बांधकाम करुन पूर्ववत करावा. तसेच जोपर्यंत कायमस्वरुपी नाल्याचे बांधकाम होत नाही, तोपर्यंत ‘केडीएमसी'ने सदर जमीन मिळकतीत कायदेशीररित्या बांधकाम परवानगी देऊ नये. लवकरात लवकर या नाल्याचे महापालिकातर्फे कायमस्वरुपी बांधकाम करुन तेथील नागरिकांना होणाऱ्या पूरपरिस्थितीच्या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी महेश भोईर यांनी अर्जाद्वारे केली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मीरा भाईंदरच्या शिवसेना शाखेत मराठी भाषेची शिकवणी