‘नवी मुंबई मेट्रो'साठी क्यूआर आधारित तिकीट प्रणाली सुरु
नवी मुंबई : कॉमन मोबिलिटी सोल्युशनच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, ‘सिडको'ने १७ जून रोजी नवी मुंबई मेट्रो लाईन-१ वर पेपर क्यूआर तिकीट प्रणाली यशस्वीपणे सुरु केली आहे. सदर नाविन्यपूर्ण तिकीट प्रणाली ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) प्रणालीचे अद्ययावतीकरण करुन साकारण्यात आली आहे, जे नव्या गरजांना पूरक आहे.
या प्रणालीचे उद्घाटन ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अधीक्षक अभियंता संतोष ओंभासे, महाव्यवस्थापक (ऑपरेशन-मेंटेनन्स) मिलींद रावराणे, ‘महामेट्रो'चे कार्यकारी अभियंता हरीश गुप्ता तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
क्यूआर आधारित तिकीट प्रणालीची १७ जून रोजी बेलापूर मेट्रो स्थानकावर अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांना जलद, सुलभ आणि सुरळीत प्रवास अनुभव प्रदान करणे, असा आहे.
प्रवाशांचा अनुभव अधिक समृध्द करण्यासाठी ‘सिडको'तर्फे भविष्यात लवकरच आणखीन काही नवीन सुविधा देखील समाविष्ट केल्या जाणार आहेत. यामध्ये मोबाईल तिकिटींग ॲपचा समावेश आहे. या ॲपच्या माध्यमातून भविष्यात प्रवाशांना ‘मेट्रोे'ची तिकीटे खरेदी करता येतील. आगामी व्हॉटस्ॲप आधारित तिकीट सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना थेट व्हॉटस्ॲपद्वारे तिकीटे खरेदी करता येतील. तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या माध्यमातून भविष्यात एकसंध पेमेंट सोल्युशन अंतर्गत विविध वाहतूक सेवा एकत्रितपणे वापरता येऊ शकतील. या सर्व सुविधा लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत.
सदर क्यूआर आधारित तिकीट प्रणाली मेसर्स औरियन प्रो सोल्युशन्स प्रा. लि. यांनी तयार केली असून, सिडको आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यांच्या देखरेखीखाली यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे.
प्रवाशांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देण्यास सिडको कटीबध्द असून क्यूआर आधारित तिकीट प्रणालीचा प्रारंभ त्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.