कोपरा गावातील अनधिकृत आठवडा बाजार बंद
खारघर : पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर सेक्टर-१० मधील कोपरा गाव शेजारील मोकळ्या भूखंडावर भरविण्यात आलेल्या अनधिकृत आठवडा बाजारावर महापालिका अतिक्रमण विभाग तर्फे तोडक कारवाई करण्यात आली.
खारघर परिसरात राजकीय कार्यकर्त्यांच्या मदतीने सेक्टर निहाय आठवडा बाजार भरविला जात होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथील हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात खारघर मध्ये भरणाऱ्या आठवडा बाजारात बांग्लादेशी नागरिक व्यवसाय करीत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केलेल्या खारघर मधील बेकायदा आठवडा बाजार संदर्भातील मुद्याची दखल घेवून महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी खारघर परिसरात भरणाऱ्या अनधिकृत आठवडा बाजारांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे खारघर मध्ये सेक्टर निहाय भरविले जाणारे अनधिकृत आठवडा बाजार बंद करण्यात आले होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून खारघर परिसरात बेकायदा आठवडा बाजार सुरु करण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरु होते. २३ एप्रिल रोजी कोपरा गाव येथे बेकायदा आठवडा बाजार भरवून या बाजारामध्ये फेरीवाले एकत्र येवून व्यवसाय करीत असल्याची माहिती महापालिका उपायुक्त रविकिरण घोडके यांना प्राप्त होताच त्यांच्या सुचनेनूसार खारघर प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी खारघर सेक्टर-१० मधील कोपरा गाव येथील अनधिकृत आठवडा बाजारात आलेल्या फेरीवाले, हातगाड्यांवर तोडक कारवाई करुन अनधिकृत आठवडा बाजार बंद केला. या कारवाईमुळे खारघर परिसरात बेकायदा आठवडा बाजार सुरु करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.