महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
कोकण विभागस्तरीय पत्रकार कार्यशाळा संपन्न
रत्नागिरी : ‘माहिती-जनसंपर्क महासंचालनालय'च्या कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ‘कृत्रिम बुध्दीमत्ता, डिजिटल युगातील बदलती पत्रकारिता, माहिती-तंत्रज्ञान, दिल्लीतील पत्रकारिता'आदि विषयांवर ३१ मे आणि १ जून या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन रत्नागिरी येथे करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘माहिती-जनसंपर्क महासंचालनालय'चे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (माहिती-प्रशासन) हेमराज बागुल, विभागीय माहिती उपसंचालक अर्चना शंभरकर, ‘कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती'चे अध्यक्ष मनोज जालनावाला, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप (ठाणे), मनिषा पिंगळे (रायगड), प्रशांत सातपुते (रत्नागिरी), वरिष्ठ पत्रकार अरविंद (अण्णा) कोकजे, ‘राज्य अधिस्वीकृती समिती'च्या सदस्य जान्हवी पाटील, प्रणव पोळेकर, ‘मराठी पत्रकार राज्य परिषद'चे उपाध्यक्ष हेमंत वणजू, अनंत ताफेकर, मेहरुन नाकाडे, उमेश तोरसकर, मोहन जाधव, प्रकाश सोनवडेकर, निलेश पानमंद, दिलीप शिंदे, दीपक दळवी यांच्यासह ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात पत्रकारिता ‘कोकण'ने जन्माला घातली आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक अशा पत्रकारांचा वारसा असलेल्या क्षेत्रात कार्यशाळा होत आहे. आधुनिकीकरण आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरुप बदलेले आहे. माझ्या ३० वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत माझे काम जनतेपर्यंत नेण्याचे महत्त्वाचे काम पत्रकारांनी केले आहे. तेही माझ्या अपरोक्ष पत्रकारांनी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आहेत. त्यामुळे मला पत्रकारांबद्दल आत्मियता आहे. ‘कोकण'चा विकास संपूर्ण महाराष्ट्राने पहावा, त्याची प्रसिध्दी करावी. या माध्यमातून परदेशातील पर्यटकांनी मोठ्या संख्येने कोकणात पर्यटनासाठी यावे, यासाठी भविष्यात अशी कार्यशाळा राज्यभरातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
समाज माध्यमांमुळे मोठमोठ्या घडामोडी कळतात. बातम्यांचा प्रभाव इतका असतो की, बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण होते. सदर सर्व होत असताना राज्यकर्त्यांकडून चांगलं काम करुन घेण्याची जबाबदारी पत्रकारांची असते. कोकणातील पत्रकारितेमध्ये वेगळी क्षमता आहे. कोकणातील पत्रकारांना बाळशस्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांचा वारसा आहे. हिंदी पत्रकारितेचे जनक बाबूराव पराडकर देखील कोकणातलेच. पत्रकारितेचे जन्मस्थान असलेले कोकण आम्ही कसे विकसीत केले, कसे जपून ठेवले आहे, ते महाराष्ट्रातील सर्व पत्रकरांनी पहावे यासाठी पुढील कार्यशाळा संपूर्ण राज्यातील पत्रकारांसाठी आयोजित करण्याचा मानस डॉ. सामंत यांनी यावेळी बोलून दाखविला.
आपत्कालीन परिस्थितीत पत्रकार काम करतात. अशा पत्रकारांच्या मागे राज्यकर्त्यांचा राजाश्रय १०० टक्के उभा करणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज ज्याप्रमाणे कार्यशाळा घेतली आहे, त्याप्रमाणे पत्रकारांसाठी आवश्यक सेवा-सुविधांची निर्मिती करण्यात येईल. महाराष्ट्रात पत्रकारांचा फक्त सन्मान नाही, तर पत्रकारांसाठी आवश्यक सेवा-सुविधांची निर्मितीही केली जाते. सदरचे चित्र देशात निर्माण झाले पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे आवाहन डॉ. उदय सामंत यांनी केले. शिवाय ‘कोकण'ची सरसता आणि समृध्दता आणि होत असलेला विकास सर्वदूर पोहोचविण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. सामंत यांनी यावेळी केले.
सदर उद्घाटन समारंभाचे उपसंचालक अर्चना शंभरकर यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान, कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी ‘एबीपी न्यूज'चे वृत्त संपादक जितेंद्र दिक्षीत (युध्दजन्य परिस्थितीतील पत्रकारिता), वरिष्ठ पत्रकार अभिजीत ब्रम्हनाथकर (दिल्लीतील पत्रकारिता), मुख्यमंत्र्यांचे माजी मुख्य जनपसंपर्क अधिकारी सतीश लळीत (फेक न्यूज, एआय तंत्रज्ञान, समाजमाध्यम हाताळणी) आणि ‘महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक समीर कर्वे (युध्दजन्य परिस्थितीतील वार्तांकनाची जबाबदारी) यांनी मार्गदर्शन करुन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
कृत्रिम बुध्दीमतेमुळे पत्रकारितेच्या विस्तारल्या सीमा -ब्रिजेश सिंह
कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन ‘माहिती-जनसंपर्क महासंचालनालय'चे प्रधान साचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी पत्रकारांच्या कार्यशाळेत ‘कृत्रिम बुध्दीमत्ता, समाजमाध्यम आणि जबाबदार पत्रकारिता' विषयावर मार्गदर्शन केले.
मोबाईलमुळे मोठा बदल घडून आलेला आहे. पत्रकारितेतील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर फायदेशीर आहे. त्यामुळे कामांमध्ये सुलभता आली आहे. एकाचवेळी ९ भाषांमध्ये लाईव्ह भाषणाचे भाषांतर करता येते, असे सांगून समाज माध्यमांमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा अतिरेक, कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे होणारे फायदे आणि होणारे नुकसान याबद्दल ब्रिजेश सिंह यांनी मार्गदर्शन केले. सत्य तुमच्याकडे आहे; मात्र ‘एआय'ला सत्य काय आहे, ते माहीत नसते. यावेळी कार्यशाळेत उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांंची सिंह यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे - हेमराज बागुल
स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक आणि राजकीय या आशयाने विकसित झालेली पत्रकारिता स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात देशाला महासत्ता करण्यासाठी विकासाच्या अंगाने जाण्याची गरज असल्याने माध्यमे आणि सरकार यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. त्यासोबतच माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे, असे ‘माहिती-जनसंपर्क महासंचालनालय'चे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल यांनी ‘माध्यमांमधील नवे वळण' या विषयावर मार्गदर्शन केले.
पत्रकारिता तंत्रज्ञान आणि आशय या दोन्ही अंगाने मोठ्या प्रमाणात बदलली आहे. शिळा प्रेस ते डिजिटल आणि कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञान अशा पध्दतीने तंत्रज्ञानाच्या अंगाने माध्यमे समृध्द झाली आहेत. नवे तंत्रज्ञान वेगळ्या पध्दतीने पत्रकारितेला पूरक आहे . ते मारक नाही. या तंत्रज्ञानाचा वापर करुन पत्रकार आपली व्यावसायिक गुणवत्ता वाढवू शकतात. कोणतेही तंत्रज्ञान मानवी जीवन समृध्द करण्यासाठी वापरता येते. किंबहुना ते त्यासाठीच असते. तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, ते आपण ठरवावे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पत्रकारितेत क्रांती झाली आहे. आंतरजालाच्या जोरावर समाजमाध्यमांमधून बातमी क्षणार्धात जगभरात पसरते. त्यामुळे माहिती मिळविणे सोपे झाले आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना देखील ती आपल्यावर मात करणार नाहीत, वर्चस्व गाजवणार नाहीत, स्वत्व सोडून त्याच्या आहारी आपण जाणार नाही, याची काळजी आपण घ्यावी. यासाठी आपल्यातील सृजनशीलता जपली आणि संवर्धित केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.