नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाची वाशीमध्ये धडक कारवाई,
घरमालकाला देखील केले सहआरोपी
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी मध्यरात्री वाशी येथील जुहूगावातील एका घरावर छापा मारुन पार्टीसाठी एकत्र जमलेल्या 14 आफ्रिकन नागरिकांची धरपकड केली. यात 9 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश असून या सर्व परदेशी नागरीकांचे पासपोर्ट आणि व्हिसाची मुदत संपल्याचे आढळुन आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 91 हजार रुपये किमतीची दारु जफ्त केली आहे. दरम्यान, या परदेशी नागरिकांसोबत संबधित घर मालकाने कोणत्याही प्रकारचा भाडेकरार केला नसल्याचे तसेच सी फॉर्म देखील भरला नसल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या परदेशी नागरिकांना राहण्यासाठी घर देणाऱया घरमालकाला देखील या गुह्यात सहआरोपी केले आहे.
वाशी येथील जुहूगावातील एचपी कॉलनीतील घर नं.599 मध्ये काही परदेशी नागरीक पार्टीसाठी एकत्र येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप निगडे यांनी 10 अधिकारी व 40 कर्मचाऱयांच्या फौजफाटासह शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास सदर घरावर छापा टाकला. तसेच घरामध्ये पार्टीसाठी जमलेल्या 9 पुरुष व 5 महिला अशा एकुण 14 जणांची धरपकड केली. त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता, त्यांच्या जवळ तब्बल 91 हजार रुपये किंमतीचा देशी विदेशी मद्य साठा सापडला.
पोलिसांनी सदरचा मद्यसाठा जफ्त करुन पकडलेल्या परदेशी नागरिकांच्या पासपोर्ट आणि व्हिजाची तपासी केली असता, त्यांच्या पासपोर्ट आणि व्हिजाची मुदत संपल्याचे आढळून आले. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाने 14 आफ्रिकन नागरिकांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 ई तसेच पासपोर्ट अधिनियम व विदेशी नागरिक कायद्यानुसार त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक केली आहे.
घर मालकावर देखील कारवाई
जुहूगावातील ज्या घरावर छापा मारुन पोलिसांनी परदेशी नागरिकांची धरपकड केली, त्या घरमालकाने सदर परदेशी नागरिकांसोबत कोणत्याही प्रकारचा भाडेकरार बनविला नसल्याचे तसेच सी फॉर्म देखील भरला नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या परदेशी नागरिकांना राहण्यासाठी घर देणाऱया घरमालक पंकज जोशी याला या गुह्यात सहआरोपी केले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वाशी पोलीस करीत आहे.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन
नागरिकांनी आपले घर भाडयाने देण्यापुर्वी भाडेकरुंची पार्श्वभूमी तपासून खात्री करुनच त्यांना घर भाड्याने द्यावे. विशेषत: परकीय नागरिकांना घर भाडयाने देण्यापुर्वी त्यांचे पासपोर्ट व सी फॉर्म यांची खात्री करावी. कायदेशीर भाडे करारनामा करावा. तसेच वेळोवेळी त्या ठिकाणी भेट देवुन आपल्या जागेचा बेकायदेशीर कामासाठी वापर होत नसल्याची खात्री करावी. सदर ठिकाणी बेकायदेशीर कृत्य चालु असल्यास अशा गैरकृत्याची माहीती स्वत: पोलीसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.