उदघाटनाच्या ४ दिवसानंतर मिरा-भाईंदर न्यायालयाचे काम ठप्प
भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांना न्यायालयीन कामासाठी २० किलोमीटर दूर ठाणे येथे जावे लागत होते. या नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जाऊन त्रासही सहन करावा लागत होता. यासाठी मिरा-भाईंदरमध्ये स्वतंत्र न्यायालयाची निर्मिती करुन त्याचे लोकार्पण झाले. परंतु, अवघ्या ४ दिवसानंतर न्यायालयाचे काम ठप्प झाल्याने मिरा-भाईंदर मधील नागरिकांना पुन्हा ठाणे न्यायालयातच यावे लागत आहे.
‘जागतिक महिला दिन'चे औचित्य साधून ८ मार्च रोजी मिरा-रोड येथील हाटकेश भागात मिरा-भाईंदर दिवाणी कनिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने न्यायालयाचे प्रत्यक्षात काम १० मार्च रोजी सुरु झाले. या न्यायालयात संग्राम सुभाष जाधव यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि कामाला सुरुवात झाली. ३ दिवसानंतर १३ ते २० मार्च पर्यंत न्यायमूर्ती संग्राम जाधव रजेवर असल्याने न्यायालयाचे काम ठप्प झाले. महत्त्वाच्या तसेच अत्यावश्यक बाबीसाठी नागरिकांना पुन्हा ठाणे येथेच जावे लागत आहे.