एपीएमसी मार्केट मध्ये यंदाही ‘क्युआर कोड'विना हापूस दाखल
वाशी : कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री होत आहे.त्यामुळे ग्राहकांना अस्सल हापूस आंबा मिळावा आणि शेतकऱ्याला चांगला दर मिळावा यासाठी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक-विक्रेता सहकारी संस्था तर्फे जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ‘क्यू आर' कोड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मात्र, यंदा देखील वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात क्युआर कोड लावलेले हापूस आंबे दाखल होत नसल्याने हापूस आंबा भेसळीचे सावट कायम आहे.
कोकणातील हापूस आंब्याची अविट चव सर्वांना सुपरिचित आहे. त्यामुळे हापूस आंबा खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. मात्र, हापूस आंब्याची वाढती मागणी पाहता काही व्यापारी मागील काही वर्षांपासून कोकण हापूस सोबत कर्नाटकी आंब्याची भेसळ करुन ग्राहकांच्या माथी मारत आहेत. मात्र, आता कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक-विक्रेता सहकारी संस्थेच्या माध्यमातून कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी हापूस या नावाने जीआय (भौगोलिक निर्देशांक) मिळाले आहे. त्यामुळे ग्राहकाला दर्जेदार हापूस आंबा मिळावा यासाठी सुमारे दोन वर्षांपूर्वी ‘कोकण हापूस आंबा उत्पादक संस्था'चे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांच्या संकल्पनेतून ‘क्यूआर कोड' प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत ‘क्यूआर कोड'ला एक्सपायरी डेट नसल्यामुळे तो पुन्हा वापरला जाण्याची शक्यता होती. त्याचा पुनर्वापर करुन गैरफायदा घेतला जाऊ शकत होता. परंतु, ‘क्यूआर कोड' प्रक्रियेतील त्रुटी दूर करुन यंदा ‘क्यूआर कोड' नव्याने निर्माण केले आहेत.त्यामुळे आता आंबे बाजारात दाखल होताच त्यांचा क्यूआर कोड तपासल्यावर आंब्याची खरी ओळख पटणार आहे. मात्र, कोकणातील आंब्याला ‘क्यूआर कोड' लावले जात असून, ‘क्यूआर कोड' असलेल्या आंब्यांना पुणे मध्ये अधिक मागणी असल्याने ‘क्यूआर कोड' लावलेले आंबे पुणे परिसराकडे अधिक रवाना होत आहेत. मात्र, राज्यात हापूस आंब्याला सर्वाधिक खप असलेल्या एपीएमसी फळ बाजारात यंदा देखील ‘क्यूआर कोड' असलेले आंबे दाखल होत नसल्याने एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्यामध्ये भेसळ होण्याची शवयता आंबा खवय्यांकडून व्यवत केली जात आहे.
गुडीपाढवा सणापासून एपीएमसी फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दरवर्षी पेक्षा या वर्षी गुडीपाढव्याला होणारी आवक जास्त असल्याने आंब्याचे दर सुद्धा खाली आले आहेत. बाजारात आवक वाढत असल्याने हापूस आंब्याचे दर देखिल ५ ते ७ टक्क्यांनी उतरले आहेत.
क्यूआर कोड मध्ये असलेली माहिती
क्यूआर कोड तपासणी केल्यास आंब्याची मुदतबाह्य (एक्सपायरी) तारीख, आंबा पॅकिंगची तारीख, आंबा परिपक्व होण्याची तारीख, हापूस आंबा बागायतदारांची सविस्तर माहिती म्हणजे बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्यांची माहिती, त्यांचे मोबाइल नंबर, ई-मेल वगैरे अनेक आवश्यक गोष्टी क्यूआर कोडमार्फत मिळू शकतात.
---------------------------------------
कोकणातील आंब्याला जीआय नामांकन मिळाले आहे. तसेच हापूस आंब्याला क्यूआर कोड लागले जाणे आनंदाची बाब आहे. मात्र, क्यूआर कोड लावलेले आंबे वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात जात नसून, या हापूस आंब्यांना पुणेकडे अधिक मागणी आहे. - महादेव मराठे, हापूस आंबा बागायतदार - देवगड.
वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात सध्या कोकणातील आंब्याची आवक वाढली आहे. या आंब्याला कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी जरी क्यूआर कोड घेतले असतील तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे तूर्तास तरी क्यूआर कोड लावलेल्या हापूस आंब्याची आवक एपीएमसी फळ बाजारात होत नाही. - संजय पिंपळे, फळ व्यापारी - एपीएमसी फळ बाजार, वाशी.