नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हिटी'
वॉटर टॅक्सी सुविधा असलेले नवी मुंबई बनणार भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २४ एप्रिल रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे नवी मुंबईतील ‘सिडको'च्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत आढावा बैठक संपन्न झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ‘मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी' तयार करण्याचे निर्देश दिले. यामध्ये जलमार्ग, मेट्रो, रस्ते मार्गांचा समावेश असेल, ज्यामुळे प्रवाशांना विविध पर्याय उपलब्ध होतील. विशेषतः या विमानतळावर वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अशी सेवा असणारे नवी मुंबई देशातील पहिले आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे.
सामान्य विमान वाहतुकीच्या सुविधा, विमान पार्किग आणि दुरुस्तीची व्यवस्था तत्काळ विकसित करण्यात यावी. तसेच रस्ते, मेट्रो, रेल्वे आणि जलवाहतूक मार्गांची कामे वेळेत पूर्ण करावीत. नैना प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या आणि नियोजित रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी भविष्यातील वाहतुकीचा अंदाज घेऊन नियोजन करावे. सर्व पायाभूत सुविधांच्या कामांसाठी निश्चित कालमर्यादा ठेवावी आणि कोणतेही काम विलंबाने होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
विमानतळाशी जोडणाऱ्या मेट्रो स्टेशनपासून नागरिकांसाठी सुलभ वाहतुकीचे नियोजन करावे. तसेच घरकुल प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करुन परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध करावीत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नवी मुंबई परिसरात सुरु असलेल्या क्रीडा सुविधा प्रकल्पांचा उल्लेख करत ‘खारघर व्हॅली गोल्फ कोर्स'चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
‘सिडको'च्या अधिकाऱ्यांसोबत सदर महत्त्वाच्या बैठकीत फडणवीस यांनी एकात्मिक आणि पर्यावरणपूरक शहरी पायाभूत सुविधांची गरज असल्याचे सांगितले. नवी मुंबईला बहुआयामी वाहतूक व्यवस्था आणि सौर ऊर्जेच्या वाढत्या वापराने चालणारे समृध्द, शाश्वत शहर म्हणून विकसित करण्यात ‘सिडको'ची महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली.
या बैठकीला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह-व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल आणि गणेश देशमुख तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विमानतळाशी जोडणाऱ्या सर्व रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतुकीचे काम वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. विमानतळाची कनेक्टिव्हिटी विनाव्यत्यय आणि पूर्ण झाली पाहिजे. अनेक आंतरराष्ट्रीय खाजगी विमाने मुंबईत येतात. यासाठी उच्च दर्जाची विमान पार्किंग पायाभूत सुविधा आणि समर्पित विमान देखभाल आणि दुरुस्ती सेवा नवी मुंबई विमानतळावर उपलब्ध असेल.
-ना. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.