जय जवान जय किसान विषयावर ‘संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेल'चा महिलादिन साजरा
पनवेल : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजेच किसान आणि सीमेवर खडा पहारा देणारा जवान आहेत, म्हणून आज आपण आपले आयुष्य घरात राहून आरामात जगत आहोत याची जाणीव आणि जागृती हाच महिलादिनाचा विषय घेऊन ‘संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेल' यांचा कार्यक्रम पार पडला. संस्थेच्या ‘चला निसर्गाकडे परत जाऊ या' ह्या उपक्रमात सहभागी होऊन संस्थेने चालू केलेल्या सुका कचरा वर्गिकरण या चळवळीत भाग घेऊनही या मातीची सेवा करू शकतो, असे मत यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सूनेत्रा गवाणकर यांनी व्यक्त केले.
आपण प्रत्येक व्यक्तीने भूमातेच्या ऋणात राहून आपले मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठीसीमेवर जाऊन लढायला पाहिजे असे नसून रोजचा एक तास समाजकार्यासाठी द्यावा. त्यासाठी घरच्याबाहेर पडण्याची गरज नाहीतर घरात राहूनही आपण सध्या भेडसावत असलेल्या ओला-सुका कचरा या राष्ट्रीय पातळीवरील समस्येत आपले योगदान देऊन हे ऋण फेडू शकतो. महिलादिनाचे औचित्य साधूनसंस्थेतील महिलांचे समाजाप्रती दातृत्व वाढीस लागून एक जबाबदार व्यक्ति म्हणुन सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्या महिलेला वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित केले जात असते. यावेळी मिसेस संवेदना २०२५ हा पुरस्कार प्रग्ना गावडे, स्त्रिशक्ती पुरस्कार अनघा भाताणकर तर अहिल्या पाटील, प्रभा पाटील आणि अरुणा लाडे यांना हरित योद्धा हा पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. आम्ही भारतीय असून आम्ही द्वेष नाही तर प्रेमावर विश्वास ठेवतो. आम्ही मातीला आई मानतो म्हणूनच आज मी माझ्या हृदयावर हात ठेऊन प्रतिज्ञा करते की, माझे अस्तित्व फक्त या भारत भूमीतच आहे. म्हणून मी या भूमातेच्या सेवेत राहून ऋण फेडेन, मी असेन नसेन पण ही भारतीय भूमी सुजलाम सुफलाम अशीच राहिली पाहिजे हेच विचार घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.