महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
तुर्भे विभागात नागरी समस्यांमध्ये वाढ
वाशी : तुर्भे विभागातील हनुमाननगर, आंबेडकर नगर, गणेशनगर, इंदिरानगर, गणपतीपाडा या परिसरात नागरी समस्या वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील समस्या मार्गी लावाव्यात, या मागणीची तड लावण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तर्फे नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
तुर्भे विभागात महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून रात्री केव्हाही पाणी सोडले जाते. पाण्याची पाईपलाईन गटाराच्या आतून असल्याने दूषित पाणी येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना टायफड, साथीचे आजार, उलटी, जुलाब अशा अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण परिसरामध्ये पावसाळापूर्व नाले, गटार साफसफाई व्यवस्थित करण्यात आलेली नाही. शौचालयांची तसेच तुर्भे प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रभागातील लाईटचे खांब नादुरुस्त झाले आहेत. यांसह अनेक समस्यांकडे शिवसेना (उबाठा) नवी मुंबई शहरप्रमुख महेश कोटीवाले यांनी महापालिका तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे यांचे लक्ष वेधून ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनाची दखल घेऊन महापालिका तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे यांनी येत्या दहा दिवसात तुर्भे विभागातील सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी शिवसेना (उबाठा) नवी मुंबई जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, महिला जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे, नवी मुंबई शहरप्रमुख महेश कोटीवाले, उपशहर प्रमुख सिध्दाराम शिलवंत, तुर्भे विभाग प्रमुख प्रेमराज जाधव, इस्माईल शेख, उपविभाग प्रमुख अन्वर खान, जितु गायकवाड, शाखाप्रमुख अशोक भामरे, जयेश कांबळे, महाराजा पिल्लई, रुतीक शिरसाट, जमाल शेख, रब्बानी कुरेशी इत्यादी उपस्थित होते.
दरम्यान, येत्या दहा दिवसात तुर्भे विभागातील सर्व नागरी समस्या मार्गी न लागल्यास संबंधित महापालिकाअधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ फासण्याचा इशारा शिवसेना (उबाठा) नवी मुंबई जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे यांनी दिला आहे.