‘टीआयएसएस'च्या विद्यार्थ्यांची ‘नमुंमपा'ला अभ्यास भेट

नवी मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) मुंबई यांच्या आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमातील ३० विद्यार्थी समुहाने प्रा. महेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहराची आपत्ती निवारण क्षमता आणि प्रगत नागरी नियोजन या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला भेट दिली.

यावेळी महापालिकेचे सहा.संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण यांनी या विद्यार्थी समुहाला नवी मुंबई शहराच्या निर्मितीपासूनचा इतिहास कथन करीत यापुढील काळात सन २०३८ पर्यंतचे नियोजन विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक- नगररचना अधिनियम (एमआरटीपी ॲवट), नागरी नियोजनाचे निकष, ‘सिडको'चा विकास आणि विकास योजना मंजुरी प्रक्रिया याविषयीही माहिती दिली.

अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी नवी मुंबई महापालिकेची पाणीपुरवठा आणि मलनिःस्सारण यंत्रणा या विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच नवी मुंबईला पूरग्रस्त होण्यापासून वाचविणारे होल्डिंग पॉन्डस्‌चे (धारण तलाव) महत्व कार्यप्रणालीसह विशद केले.त्याचप्रमाणे ‘नमुंमपा'ची घनकचरा व्यवस्थापन प्रणाली कार्यक्षम राहून कशा पध्दतीने प्रभावी काम करते, याचे सविस्तर विवेचन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नावर सोमनाथ केकाण यांनी सविस्तर माहिती देत त्यांचे शंका समाधान केले.

या भेटीप्रसंगी विद्यार्थ्यांनी नेरुळ येथील अत्याधुनिक त्रिस्तरीय जलशुध्दीकरण प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पाचे अवलोकन करुन विद्यार्थ्यांनी ‘नमुंमपा'च्या अद्ययावत पायाभूत सुविधांची आणि भविष्यातील नियोजनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

यावेळी प्रा. महेश कांबळे यांनी सदर शैक्षणिक भेट विद्यार्थ्यांना केवळ आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यास नव्हे, तर दीर्घकालीन योजना आणि भक्कम पायाभूत सुविधा यांच्याद्वारे शहर कसे सुरक्षित बनते याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी ठरली. नवी मुंबई शहर इतर शहरांसाठी आदर्श ठरु शकते, असे अभिप्राय व्यक्त केले.

सदर अभ्यास भेटीद्वारे शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी आणि नागरी प्रशासन यांच्यातील समन्वयातून आगामी काळातील शहरी नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन याविषयी विचारांचे आदान-प्रदान झाले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

युपीएससी परीक्षेत सी. डी. देशमुख संस्थेतील ४ विद्यार्थ्यांचे सुयश