‘मिशन भरारी'मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे आभाळाशी नाते

‘सायन्स सोल्जर्स' घडवण्याचा संकल्प -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी' या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या इस्त्रो अभ्यासदौऱ्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २७ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. सदरचा शुभेच्छा समारंभ जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

‘मिशन भरारी' केवळ उपक्रम नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारा व्यापक प्रयत्न आहे. आपल्या मातीतल्या लेकरांना आभाळाशी नाते जोडण्याची संधी आहे. अल्पावधीत, केवळ ३ महिन्यात सदर उपक्रम प्रत्यक्षात उतरविणे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे द्योतक आहे. पूर्वी सरकारी कामांना विलंब होत असल्याची धारणा होती; मात्र आज शासनाच्या कार्यपध्दतीत वेग आणि परिणामकारकता दिसून येते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सदर स्पर्धेतून निवड झालेले ५९ विद्यार्थी माझ्या दृष्टीने ‘सायन्स सोल्जर्स' आहेत. जसे सीमेवरील जवान देशाचे रक्षण करतात, तसे सदर विद्यार्थी देशाचे वैज्ञानिक भविष्य घडवतील. विज्ञान म्हणजे केवळ माहिती नसून जिज्ञासा आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती आहे. ‘का?' असा प्रश्न विचारण्याची सवय जोपासा. हीच सवय तुम्हाला मोठ्या शोधांपर्यंत घेऊन जाईल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

अभ्यासदौरा केवळ पर्यटन नसून प्रत्यक्ष विज्ञानाचा अनुभव देणारी आहे. विक्रम साराभाई अवकाश केंद्र, थुंबा रॉकेट लाँचिंग स्टेशन यासारख्या ठिकाणी भेट देताना मिळणारा अनुभव तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल. शाळेतील ३६५दिवसांच्या शिक्षणाइतकेच  काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.
-ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री-महाराष्ट्र.

ग्रामीण भागात अपार क्षमता आहे. योग्य संधी आणि व्यासपीठ दिल्यास सदर मुलेही आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेऊ शकतात. भविष्यात याच विद्यार्थ्यांमधून  ए.पी.जे. अब्दुल कलाम किंवा कल्पना चावला यांच्यासारखे शास्त्रज्ञ घडतील, असा विश्वास व्यक्त करीत मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि देशासाठी कार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले, ‘मिशन भरारी' उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक ठरणारा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या वैज्ञानिक संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यांच्या विचारविश्वाला व्यापकता देण्याचा प्रयत्न आहे. या अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात निश्चितच वाढ होईल. तसेच त्यांच्या मनात विज्ञान, संशोधन आणि नवतंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण होईल. पाठ्यपुस्तकातील ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळेल. भविष्यात हेच विद्यार्थी विविध क्षेत्रात यश संपादन करुन समाज आणि देशाच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी व्यवत केला.

सदर कार्यक्रमास आ. निरंजन डावकरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. किसन कथोरे, आ. डॉ. बालाजी किणीकर, आ. शांताराम मोरे, आ. राजेश मोरे, पालक सचिव ठाणे नवीन सोना, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, अपर जिल्हाधिकारी हरिचंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, कार्यक्रम अधिकारी संजय बागुल तसेच विविध मान्यवर आणि अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

‘मिशन भरारी' या उपक्रमाचे औपचारिक अनावरण २६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून जिल्हास्तरावर निवड झालेल्या ५९ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी २७ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत देशातील नामांकित वैज्ञानिक केंद्रांना शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर अभ्यासदौरा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक आणि वैज्ञानिक संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणे, असा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा