औषधी सफेद कांद्याला ग्राहकांची वाढती मागणी
उरण : खरीप हंगामात भातपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. मात्र, रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिके घेतली जात नाहीत. पण, गेल्या काही वर्षांमध्ये पिक परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने पांढरा कांदा पिकाची लागवड रायगड जिल्ह्यात होऊ लागली आहे. या कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे.
अलिबाग मध्ये उत्पादित पांढऱ्या कांद्याला केंद्रीय पेंटट विभागाने भौगोलिक मानांकन दिले आहे. त्यामुळे रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असलेल्या सफेद कांद्याला मागणी वाढली आहे. पांढऱ्या कांद्याला दरही चांगला मिळत आहे.
औषधी गुणधर्मामुळे नावारुपाला आलेला अलिबाग मधील पांढरा कांदा विक्रीसाठी उरण बाजारात दाखल झाला आहे. या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. परराज्यातून देखील पांढऱ्या कांद्याला मागणी असून, औषधी गुणधर्म युक्त आणि चविस्ट कांदा असल्याने पांढरा कांदा खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. उरण बाजारपेठेतील सीटीझन हायस्कूल रोड, राजपाल नाका बाजारपेठ, गांधी चौक आदि ठिकाणी पांढऱ्या कांद्याच्या माळी विकावयास आल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील नेहुली, खंडाळे, कार्ले, सागाव मारुतीधुळे, खंडाळा, नेवली, खाना उसर, तळवली या गावांमध्ये औषधी गुणधर्म युक्त आणि चविस्ट पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जाते. आता अलिबाग तालुक्यातील इतरही गावांमधील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करु लागले आहेत. त्यामुळे पांढरा कांदा लागवडीखालील क्षेत्र १०० हेक्टरवरुन २४५ हेक्टरपर्यंत वाढले आहे. लहान सफेद कांद्याची माळ १०० रुपये तर मोठ्या सफेद कांद्याची माळ २५० रुपये दराने विकली जात आहे, असे अलिबाग तालुक्यातील कावाडे येथील कांदे विक्रेत्या रोशनी रवींद्र म्हात्रे यांनी सांगितले.
अलिबाग मधील औषधी गुणधर्म युक्त सफेद कांदा चवीला गोड असल्याने उरण मधील नागरिक पांढरा कांदा मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत.