इकोफ्रेंडली रक्षाबंधन’ उपक्रम नवी मुंबई महापालिकेत उत्साहात साजरा

नवी मुंबई :  9 ऑगस्ट रोजी देशभरात उत्साहात साज-या होणा-या रक्षाबंधन सणाला पर्यावरणशील स्पर्श देणारा ‘इको-फ्रेंडली रक्षाबंधन’ हा अभिनव उपक्रम महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात उत्साहात संपन्न झाला. यावेळी नवी मुंबई महापालिकेच्या वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पामध्ये बनविण्यात आलेल्या कापडाच्या आकर्षक राख्यांचे वितरण महानगरपालिकेतील महिला –  अधिकारी, कर्मचारी यांना करण्यात आले. 

केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयांतर्गत वस्त्र समितीच्या वतीने नवी मुंबई महापालिका समवेत ‘वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा प्रकल्प (Textile Recycling Facility )’ देशात पहिल्यांदाच सीबीडी बेलापूर येथे राबविण्यात येत आहे. याठिकाणी नागरिकांनी वापरलेले सुस्थितीतले टाकाऊ कपडे ठिकठिकाणाहून संकलित करुन त्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते व त्यापासून शोभिवंत उपयोगी वस्तू व कापड तयार करुन पुनर्वापरासाठी उपयोगात आणले जाते.

या अनुषंगाने रक्षाबंधनाचा सण लक्षात घेऊन प्रकल्पस्थळी विविधरंगी आकर्षक कापडी राख्या बनविण्यात आल्या असून त्याचा प्रचार सर्वत्र होण्यासाठी महापालिका मुख्यालय व आठही विभाग कार्यालये याठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉल्सची व त्या अनुषंगाने वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची माहिती जनतेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात प्रसारित होण्याकरीता ‘इकोफ्रेंडली रक्षाबंधन’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.

यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व स्मिता काळे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, सहा.आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे, सहा.आयुक्त अलका महापुरकर, स्वरुपा परळीकर, शिल्पा देशपांडे व प्रकल्प संचालक प्रकाश सैनी आणि संयोजक सोनावणे आदी मान्यवरांच्या हस्ते कापडी राख्यांचे मोठया संख्येने उपस्थित महिला अधिकारी, कर्मचारी यांना वाटप करण्यात आले.

या प्रकल्पांतर्गत 250 हून अधिक सोसायट्यांमध्ये वापरलेले सुस्थितीत कपडे संकलीत करण्यासाठी संकलन पेट्या ठेवण्यात येत असून त्यामधे जमा झालेले कपडे गोळा करुन प्रकल्पस्थळी आणले जातात व त्यांची आठ प्रकारे वर्गवारी करण्यात येते. त्या कपडयांवर त्यांच्या स्वरुपानुसार पुनर्प्रक्रिया करण्यात येऊन त्यापासून धागे वेगळे काढले जातात व नवीन कापड तयार करण्यात येते. तसेच त्यामधील विविधरंगी कपड्यापासून इतर अनेक उपयुक्त वस्तू बनविल्या जातात. विशेष म्हणजे या प्रकल्पाव्दारे बचत गटातील महिलांना मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे.

त्यामुळे या रक्षाबंधन सणाला वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून निर्माण केलेल्या आकर्षक कापडी राख्यांचा उपयोग करण्यासाठी त्या नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयात व मुख्यालयात स्टॉल लावण्यात आले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोकण वसाहत पुनर्वसन बाधितांचे उपोषण सुरुच