चेन्नईवासियांचा ‘लिंबूचा गणपतीे'
भिवंडीः भिवंडी शहरात वास्तव्यास असणाऱ्या चेन्नईवासियांसाठी लिंबूच्या गणपतीची आस्था गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. गणेशाला लिंबू वाढवून संतान प्राप्तीसाठी देवाकडे मागणे मागितल्यानंतर मुलबाळ प्राप्तीची मनोकामना पूर्ण करत असल्याने सदरची परंपरा भिवंडीत सुरु असल्याची माहिती ‘दक्षिण भारतीय गणेश मंडळ'चे अध्यक्ष परशुराम विरास्वामी मुधलीयार यांनी दिली.
भिवंडी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे चेन्नईचे गणेशभक्त गजाननाचरणी मागितलेला नवस पूर्ण करण्यासाठी गणपतीला ११, २१ किंवा ५१ लिंबू वाढवून मूलबाळ प्राप्तिकरिता साकडे घालत असतात. त्यांची सदर आराधना पूर्णही होत असते, असेही परशुराम मुधलीयार यांनी सांगितले. सदर गणपती उत्सव ७३ वर्ष जुना असून मागील ३३ वर्षांपासून श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना भाजी मार्केट मधील जुन्या निजामपूरा पोलीस ठाण्याच्या समोर करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच शहरातील कामतघर, नवी वस्तीतील चेन्नई रहिवाशांनी लिंबूच्या गणपतीच्या स्थापनेचा प्रयत्न केला होता. मात्र, ४ ते ५ वर्षांनीच त्या ठिकाणी नागरिकांनी स्थलांतर केल्याने कामतघर, नवी वस्तीतील गणरायांच्या स्थापनेची प्रथा बंद झाली आहे. तर भाजी मार्केटमधील लिंबूच्या गणपतीचे विशेष आकर्षण विसर्जनादरम्यान आहे.
विसर्जनाकरिता १० दिवस मंडळातील स्थानिक ९ जण एकवेळ कडक उपवास करतात. तसेच ५ जण चेन्नईतील विरपुरम येथून बोलवले जातात. त्यानंतर विसर्जनावेळी सर्व १४ जणांच्या पाठीवर शरीरातून पिंजरा ओवून त्याला १०८ लिंंबू लावले जातात. त्रिशूल व्हेल तोंडाच्या जबड्यातून आरपार करुन विसर्जनासाठी गणपती विराजलेल्या रथाला ओढले जाते. गणरायाची विसर्जन यात्रा छत्रपती शिवाजी चौक परिसरातून पुढे दर्गाजवळ आल्यानंतर दर्गा जवळच्या परिसरात लिंबूचा झाड असल्याने त्या ठिकाणी लिंबूच्या झाडाची पूजा करुन गणपती बाप्पाचे विसर्जन केले जात होते. त्यामुळे विसर्जनासाठी नेमलेल्या १४ जणांचा पिंजरा आणि त्रिशूल व्हेल दर्गा परिसरात उतरवून रथ काढून गणपतीचे विसर्जन केले जात आहे. त्यामुळे या गणपतीची विसर्जन यात्रा शहरात दरवर्षी चर्चेचा विषय ठरत आहे.