‘महाराजस्व अभियान'मध्ये भिवंडी तहसील कार्यालय अव्वल
भिवंडी : १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकांत पांचाळ, उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने ३ टप्प्यात पाणंद रस्ते, आदिवासी कातकरी समाजासाठी घरकुल तर आदिम कातकरी उत्थान कार्यक्रमात आरोग्य शिबिर, जातीचे दाखले, आधारकार्ड अशा सेवा हजारो लोकांना मिळवून दिल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात तालुक्यातील पाणंद शिवार रस्ते विषयक मोहीम राबविली. ज्यामध्ये तालुक्यातील २४० गावांमधील गाव नकाशावर नोंद असलेले ४१२ रस्ते तर गाव नकाशावर नोंद नसलेले ६८६ अशा एकूण १०९८ रस्त्यांचा शोध घेऊन पहिल्या टप्प्यात ८ गावांमधील २५ रस्त्यांचे सीमांकन करण्यात आले आहे. तर १०७३ उर्वरित रस्त्यांची तपासणी आणि मोजणी करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात ५५ घरकुल आदेश वाटप करण्यात आले. ज्यामधील वनपट्टे जागे वरील ४०, गांवठाण जागेवरील १५ घरकुलांचा समावेश आहे. यासोबत ४७ घरकुल धारकांना स्वामित्व हक्क प्रदान करण्यात आले. तर २७ कुटुंबियांना कातकरी घरठाणाचे आदेश वितरण करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली पाये नाईक पाडा, महाळुंगे येथील गोठणपाडा, मथे पाडा, पिरपाडा, म्हणपाडा, घोटगाव पाडा, ग्रुप ग्रामपंचायत डोहोळे, कुंदे गावातील घाटणेपाडा, इजर पाडा, कातकरी वाडी असलेल्या करमाळा, चिंचवली, दुधणी येथे तर शेलार गावाच्या हद्दीतील आदिवासी पाडा, धातला तलाव, सरपंच पाडा, बोरपाडा, कासार पाडा, मिठपाडा, अत्तर नगर, आदिवासी कॉलनी अशा विविध ठिकाणी शिबिरामध्ये आरोग्य तपासणी, बालकांचे लसीकरण करण्यात आले. तर आधारकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्न दाखले जन्मनोंद अशा आवश्यक दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये ४६ जणांना आधारकार्ड, ३५ जणांना आयुष्यमान भारत कार्ड, ३३७ जणांना जातीचे दाखले, २२ जणांना उत्पन्न दाखले, १४८ कातकरी विद्यार्थ्यांची जन्मनोंद आदेश पारित करण्यात आले.
महाराजस्व अभियान अंतर्गत ६८९ जणांना विविध सेवांचा लाभ मिळाला. तर १२९ जणांना घरकुल मिळवून देण्यासाठी सहाय्य केल्याची माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली. सर्व मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, ग्राम महसूल अधिकारी यांनी सदर अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतल्याचे खोले यांनी सांगितले.