धबधब्यावर अडकलेल्या ५ तरुणांची सुटका
खारघर : खारघर मधील गोल्फ कोर्स आणि ड्रायव्हिंग रेंजच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावर ७०० मीटर आत असलेल्या धबधब्याच्या खाली अडकलेल्या ५ तरुणांची खारघर अग्निशमन जवानांनी सुखरूप बाहेर केली आहे. सदर पाचही तरुण सायन कोळीवाडा येथील आहेत.
२ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे सदर तरुण पांडवकडा धबधबाचा आनंद घेण्यासाठी आले होते. दरम्यान, पांडवकडा धबधबा बंद असल्यामुळे सायन-कोळीवाडा येथील आंबेडकर चाळीत राहणारे महेश सुभाष शिरगड (२२), राकेश वेलमुर्गन (१८), प्रतिक जोग (१८), रमेश चिंगमेटे (१९) आणि साहील शेख (२१) असे ५ तरुण खारघर, सेक्टर-६ मधील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ड्रायविंग रेंजच्या रस्त्याने गोल्फ कोर्सच्या मागील बाजुस असलेल्या धबधब्याखाली पावसाचा आनंद घेत होते.
दरम्यान, २६ मे रोजी दुपार नंतर पावसाचा जोर वाढल्याने सदर पाचही तरुण धबधब्याखाली अडकल्याची माहिती खारघर अग्निशमन केंद्राला प्राप्त होताच अग्निशमन जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोरीच्या मदतीने पाचही तरुणांची सुखरूप सुटका करुन त्यांना खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले. खारघर अग्निशमन केंद्राचे अधिकारी सौरभ पाटील यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी पांडवकडा धबधबा बंद आहे. १० वर्षापासून गोल्फ कोर्सच्या मागील बाजुस डोंगरावर अडकून काही तरुण वाहून गेल्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे पर्यटकांनी पावसाळा कालावधीत डोंगरावर जावू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.