अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, रस्ते पाण्याखाली

उरण : मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा तडाखा उरण तालुक्याला बसला असून रहिवाशांच्या घरांची पडझड झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहन चालक बेजार झाले आहेत. झाडे उन्मळून पडली असून जागतिक किर्तीच्या जेएनपीए बंदराची आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमी मेहनत घेणाऱ्या ‘न्हावा-शेवा पोलीस ठाणे'च्या इमारतीत पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलिसांना कामकाज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

उरण तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रानसई, मोठी जुई, पिरकोण, चाणजे, जासई, सारडे, कोप्रोली, चिरनेर या ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशांची कौलारु घरे पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी रहिवाशांचे आर्थिक नुकसान झाले आहे. उरण महसूल विभागाच्या माध्यमातून सदर नुकसानीसंदर्भात पंचनामे करण्याचे काम सुरु असल्याची माहिती उरण तहसील कार्यालयाकडून देण्यात आली.

उरण जेएनपीए बंदराला जोडणारे नवी मुंबई, पनवेल शहराकडील रस्ते पाण्याखाली गेल्याने आणि झाडे उन्मळून पडल्याने वाहन चालक प्रवाशी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. तसेच जेएनपीए बंदराची आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमी मेहनत घेणाऱ्या ‘न्हावा-शेवा पोलीस ठाणे'च्या इमारतीत पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलिसांना कामकाज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, अतिवृष्टीचा तडाखा उरण तालुक्याला बसत असताना आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी किंवा ठिकठिकाणचे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, तलाठी,मंडळ अधिकारी, कृषि विभागाचे अधिकारी तसेच इतर शासकीय अधिकारी वर्ग आपआपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसर जलमय