यंदाही धोकादायक इमारतीमधूनच कांदा-बटाटा व्यापाऱ्यांचा व्यवसाय?

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मधील संपूर्ण कांदा-बटाटा आवारातील इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. मात्र, कांदा-बटाटा आवारातील व्यापारी आणि एपीएमसी प्रशासन मध्ये सुरु असलेला पर्यायी जागेचा तिढा अद्याप सुटला नसल्याने कांदा-बटाटा व्यापारी यंदा देखील धोकादायक इमारतीमधूनच व्यवसाय करणार आहेत.

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती कांदा- बटाटा बाजारातील सिडको निर्मित इमारती वर्षानुवर्षं धोकादायक जाहीर होत आहेत. या इमारती पावसाळ्यापूर्वी धोकादायक यादीत समाविष्ट होत असतात. सन २००५पासून कांदा-बटाटा बाजार अतिधोकादायक जाहीर होत असून  मे मध्ये खाली करण्याच्या नोटीस बजावण्यात येतात. गेले कित्येक वर्षांपासून सदर चक्र सुरु असून, यंदा देखील एपीएमसी आणि नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कांदा-बटाटा बाजारातील गाळे धारकांना नोटीस देऊन गाळे खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एकीकडे कांदा-बटाटा बाजारातील पुनर्बांधणीचा विषय प्रस्तावित आहे.त्यामुळे कांदा-बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांना पुनर्बांधणी पूर्वी व्यापाराच्या सहज दृष्टीकोनातून  पर्यायी जागा उपलब्ध देण्याची मागणी होत आहे. यासाठी एपीएमसी बाजार आवारातील लिलाव गृह शेजारी आणि मॅफको मार्केट मागील मोकळा भूखंड या दोन ठिकाणी कांदा-बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांसाठी तात्पुरते गाळे उभारण्याचा एपीएमसी प्रशासनाचा मानस आहे. मात्र, यावर अद्याप अंमलबजावणी न झाल्याने यंदा देखील कांदा-बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांवर डोवयावर टांगती तलवार घेऊन व्यवसाय करण्याची वेळ येणार आहे.

एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारातील गाळे अतिधोकादायक घोषित केले असले तरी एपीएमसी प्रशासनाने लोखंडी खांब लाऊन तात्पुरती डागडुजी केली आहे. एपीएमसी प्रशासनाने व्यापाराच्या सुलभतेने जर पर्यायी गाळे याच आवारात उभारले तर व्यापारी अवश्य  सहकार्य करतील. - दिगंबर राऊत, कांदा-बटाटा व्यापारी - मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), वाशी.

एपीएमसी कांदा-बटाटा आवारातील सर्व इमारती अती धोकादायक झाल्याने पुनर्विकास प्रस्तावित आहे. तोपर्यंत शेतकरी, ग्राहक आणि व्यापारी यांच्या सोयीसाठी लिलाव गृह शेजारील आणि मॅफको मार्केट मागील लिलाव गृहाला लागूनच असलेला भूखंड या दोन जागा निवडण्यात आल्या असून या ठिकाणी पर्यायी गाळे उभारण्याचा एपीएमसी प्रशासनाचा विचार सुरु आहे. - मेहहुब व्यापारी, उप अभियंता - कांदा-बटाटा मार्केट, एपीएमसी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उल्हासनगर मध्ये पहिला बायोगॅस प्रकल्प सुरु