बदलापूर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र.१  राहणार दिड महिना बंद

लिफ्ट, एस्कलेटरचे काम झाल्यानंतर काढणार संरक्षक जाळी -खा. सुरेश म्हात्रे

बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक-१ बंद करुन त्याठिकाणी लोखंडी संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक-२वर लिपट, सरकत जिन्याचे (एस्कलेटर) काम झाल्यानंतर सदरी संरक्षक लोखंडी जाळी काढण्यात येईल, असे आश्वासन खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी दिले आहे.

तसे न झाल्यास मी स्वतः सदरची जाळी काढून टाकेन, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, किमान दीड महिना तरी प्लॅटफॉर्म क्रमांक-१ बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र.१ लोखंडी संरक्षक जाळी बसवून रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केल्याने बदलापुरातील रेल्वे प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याची दखल घेत खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी २२ एप्रिल रोजी बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष'चे प्रदेश संघटक सचिव हेमंत रुमणे, शिवसेना शहरप्रमुख किशोर पाटील, ‘काँग्रेस'चे लक्ष्मण कुडव, असगर खान आदिंसह ‘महाविकास आघाडी'चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

बदलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक-१ वर बसविण्यात आलेली लोखंडी जाळी आणि होम प्लॅटफॉर्मच्या सुरु असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर बाळ्या मामा म्हात्रे यांनी आरपीएफ कार्यालयात रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २वर लिपट, एस्कलेटरचे काम झाल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक-१वर बसविण्यात आलेली लोखंडी संरक्षक जाळी काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. लिपट, एस्कलेटरचे काम महिना-दीड महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. तोपर्यंत ठीक आहे; परंतु त्यानंतर संरक्षक जाळी न काढल्यास आपण स्वतः ती जाळी काढून टाकेन, असा इशाराही खा. बाळ्या मामा यांनी दिला.

रेल्वे अधिकाऱ्यांना धरले धारेवर...
प्लॅटफॉर्म क्रमांक-१वर लोखंडी संरक्षक जाळी उभारण्याच्या निर्णयाबाबत रेल्वे प्रशासनाने किमान एक महिना अगोदर प्रवाशांना माहिती देणे गरजेचे होते. खासदार म्हणून मलाही पत्र देण्याची, स्थानकावर फलक लावण्याची तसेच उद्‌घोषणा करण्याची गरज होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने तसे काही न करता थेट जाळी बसवली. ती दादागिरी नाही का? असा सवाल करीत खासदार म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दररोज हजाराेंच्या संख्येने प्रवासी बदलापूर स्थानकात येतात. एक फलाट बंद केला तर दुसऱ्या फलाटावर भार वाढतो. एक लोकल जर उशिराने आली तर गर्दी दुप्पटीने वाढते. त्यामुळे लोखंडी जाळी काढावी, अशी आमची मागणी असल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाने लोक भावनेचा आदर करुन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रवाशांची फरफट...

पूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक-१ आणि १-अ अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर गर्दी विभागली जात होती. त्यामुळे प्रवाशांना चढताना त्याचा फायदा होत होता. कर्जत, खोपोली भागात राहणारे अनेक प्रवाशी मुंबईहून बदलापूर लोकलने प्रवास करतात, बदलापूर स्थानकात उतरत होते. प्लॅटफॉर्म क्रमांक-१वर येऊन प्रवासी थांबत होते. प्लॅटफॉर्म क्रमांक-१ आणि २ संयुक्त असल्याने त्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक-२ वरुन कर्जत, खोपोलीकडे जाणारी लोकल पकडणे सोयीचे होत होते. आता प्लॅटफॉर्म क्रमांक-१वर उतरुन प्रवाशांना जिन्याने प्लॅटफॉर्म क्रमांक-२ वर यावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निर्धार मेळाव्यात ग्वाही