नेरुळ येथील ‘स्मृती उद्यान' संकल्पना बासनात

वाशी : नवी मुंबई महापालिका उद्यान विभाग मार्फत नेरुळ मधील ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई' लगत नवीन वृक्ष लागवड करण्यासाठी सन- २०१९ मध्ये स्मृती उद्यान निर्माण करण्यात आले होते. नवी मुंबई शहरातील आपल्या जुन्या किंवा नवीन आठवणींना उजाळा देण्यासाठी झाड लावून वृक्षरुपी स्मृतींची जोपासना करावी, या उद्देशाने नेरुळ येथील ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई' लगत मोकळ्या भूखंडावर स्मृती उद्यान निर्माण करण्यात येणार होते. मात्र, स्मृती उद्यानाची संकल्पना बारगळली असून, या स्मृतीरुपी वृक्षांच्या स्मृती हरवल्याचे चित्र दिसत आहे.

नेरुळ सेवटर-२६ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई स्थळ पामबीच मार्ग या नवी मुंबई शहरातील मुख्य रस्त्यालगत आहे. त्यामुळे याठिकाणी सकाळी आणि सायंकाळी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. अनेक नागरिकांकरिता विरंगुळा केंद्र असा नावलौकिक असलेल्या ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई' लगत अधिक वृक्ष लागवड करुन परिसरात हिरवळ निर्माण करण्यासाठी येथे स्मृती उद्यान तयार करण्यात येत होते. ५ एकर जागेत स्मृती उद्यान निर्माण होणार होते. या स्मृती उद्यान मध्ये बालकाच्या जन्माच्या आनंदानिमित्त ‘शुभेच्छा वृक्ष', शुभविवाहाचे औचित्य साधून ‘शुभमंगल वृक्ष', परीक्षा आणि इतर क्षेत्रातील यशाबद्दल ‘आनंद वृक्ष', सासरी जाणाऱ्या मुलीसाठी शुभेच्छा म्हणून ‘माहेरची झाडी', प्रियजनांच्या मृत्यूनंतर ‘स्मृतीवृक्ष' अशा विविध प्रसंगांची आठवण वृक्षरोपी लागवड करुन जपण्याची संकल्पना होती. यामध्ये प्रियजनांच्या मृत्यूनंतर ‘स्मृतीवृक्ष' करिता अधिक अर्ज दाखल झाले होते. वृक्ष लागवडीकरीता इच्छूक नागरिकांकडून प्रतिवृक्ष एक हजार रुपये देखील घेण्यात आले होते. महापालिका तर्फे वृक्षरोपाकरिता खड्डा खोदणे, लालमाती, शेणखत भरणे, वृक्ष लागवड करणे, वृक्ष लागवड करण्यात येणाऱ्या व्यक्तिच्या नावाचे नामफलक बनवून बसविणे तसेच लागवड केलेल्या वृक्षरोपांचे संवर्धन करणे यांचा समावेश होता. स्मृती उद्यान मध्ये १ हजार वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, त्याआधीच ‘स्मृती उद्यान' योजना गुंडाळण्यात आली आहे. स्मृति उद्यानाच्या ठिकाणी लावलेल्या झाडांची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे.

सन-२०१९ मध्ये स्मृती उद्यान संकल्पना अंमलात आणण्यात आली होती. मात्र, मध्यंतरीच्या कालावधीत स्मृती उद्यान संकल्पना थांबवण्यात आली. याबाबत आयुक्तांशी चर्चा करुन पुन्हा स्मृती उद्यान संकल्पना कशी नव्याने सुरु करता येईल याबाबत विचारविनिमय सुरु आहे. - किसनराव पलांडे, उपायुक्त (परिमंडळ-१, उद्यान विभाग) - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

चिरनेरमधून जाणाऱ्या हायस्पीड राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी