नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां'चे नाव

आगरी-कोळी समाजाचे शिवसेना पक्षावर खूप ऋण आहेत. यापुढे आपण एकीने दि. बा. पाटील यांंच्या नावासाठी आग्रही राहु -  उध्दव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री-महाराष्ट्र. 


नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांच्यी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत याबाबतच निर्णय घेण्यात आला आहे. स्वतः मुखमंत्री उध्दव ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांच्या नावाला होकार दिला आहे. तसेच त्यांनी दि.बा. पाटील यांच्या नावाला माझा विरोध कधीच नव्हता, असे यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे असा प्रस्ताव पुढे आला होता. त्यामुळे यावरुन मोठा वाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. मात्र, आज प्रकल्पग्रस्त नेत्यांसह आगरी-कोळी, कुणबी समाजातील नेत्यांनी २८ जून रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्त नेत्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री ठाकरे यांना विनंती केली. तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी ठाणे आणि रायगड जिल्ह्यामधील प्रकल्पग्रस्तांच्या भावनेचा विचार करुन नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली. अखेर प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा सफल होऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचे मान्य केले. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी दि. बा. पाटील यांच्या नावाला माझा कुठलाही विरोध नाही, असेही स्पष्ट केले.

सदर बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठी माणसात होणारे वाद थांबले पाहिजेत. माझे आजोबा आण वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीत नावासाठी कधीही आग्रह केला नाही. ज्यावेळी नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायचा विषय आला त्यावेळी मी हीच सुचना केली होती की, जर नावाबाबत वाद विवाद असेल तर तो विषय संपवा. परंतु, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी साहेब मी जबाबदारी घेताे आणि सदर विषय मार्गी लावतो, तुम्हीं काळजी करु नका, असे सांगितले होते. त्यानंतर ना मला प्रकल्पग्रस्त नेत्यांची समिती भेटली, ना मंत्र्यांनी विषय काढ़ला, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सदर बैठकीत सांगितल्याची माहिती शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील यांनी दिली.

सदर बैठकीप्रसंगी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, आर.सी.घरत, प्रकल्पग्रस्त नेते राजाराम पाटील, ऐरोली जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर,  उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, एम.के. मढवी, रोहिदास पाटील, शहरप्रमुख प्रविण म्हात्रे, माजी नरसेवक सोमनाथ वास्कर, करण मढवी, चेतन नाईक, संजय तरे, उपशहरप्रमुख सुर्यकांत मढवी, दीपक घरत, आदिंसह रायगड आणि नवी मुंबई मधील प्रकल्पग्रस्त नेते उपस्थित होते.

मी जर ठरवल असते तर कधीही मी सभागृहात विषय मंजूर करुन नामकरण जबरदस्तीने केले असते. पण, मी जाणिवपूर्वक सदर विषय आजतागयत सभागृहात घेतला नाही. नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा विषय फक्त सिडको बोर्ड मिटींगमध्ये मंजूर झाला आहे. संभाजीनगर नामांतरासारखा विधी मंडळ सभागृहात विषय मंजूर झालेला नाही. त्यामुळे काळजी नसावी. आज मी तुम्हाला अश्वासित करतो कि मा. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाची एकजुठ अभेद्य रहावी म्हणून आपली हयात घालवली, त्याच शिवसेनाप्रमुखांच्या नावासाठी मी मराठी माणसात फुट पाडणार नाही. विशेषतः आगरी-कोळी समाजाचे शिवसेना पक्षावर खूप ऋण आहेत. त्यामुळे यापुढे आपण एकीने दि. बा. पाटील यांंच्या नावासाठी आग्रही राहु.
-उध्दव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री-महाराष्ट्र. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महाविकास आघाडी सरकारचा ऐतिहासिक निर्णय