स्वच्छतेप्रमाणेच नवी मुंबईला चढतोय सुंदरतेचा साज

नवी मुंबई : स्वच्छतेमध्ये आघाडीवर असणाऱ्या नवी मुंबई शहराने सुशोभिकरणालाही तितकेच महत्व दिले आहे. या अंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा तसेच वर्दळीच्या जागा, प्रमुख चौक, दर्शनी भाग अशा विविध ठिकाणी आकर्षक चित्रभिंती रंगवून, शिल्पाकृतींची नवरचना करुन, रस्ते दुभाजकांची रंगरंगोटी करुन शहराला सुंदरतेचा साज चढविला जात आहे.

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर ते दिघा पर्यंत आठही विभागांमध्ये लक्षवेधी रंगसंगतीद्वारे चित्रभिंती सजविल्या जात आहेत. त्यावर विविध जनजागृतीपर संदेश ‘सुलेखन'द्वारे रेखाटून स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण याविषयी जागरुकता निर्माण केली जात आहे. यामध्ये ज्याठिकाणी यापूर्वी काढलेली चित्रे सुस्थितीत आहेत, त्यावर पाणी मारुन ती धुवून घेतली जात आहेत. विशेष म्हणजे चित्रे धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या ऐवजी प्रक्रियाकृत पाण्याचा वापर केला जात आहे. विशेषत्वाने शहरातील मुख्य रस्ते आणि वर्दळीची ठिकाणे येथे मोठ्य प्रमाणात लोकांची रहदारी असल्याने अशा ठिकाणच्या सुशोभिकरणावर विशेष भर देण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे रस्त्यांशेजारील पदपथांचे कर्बस्टोन आणि दुभाजकांचे कर्बस्टोन यांचीही वाहतूक नियमानुसार पिवळ्या-काळ्या रंगात रंगरंगोटी केली जात आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या आकर्षक शिल्पाकृतींची डागडुजी करण्यात येत असून आवश्यक तेथे शिल्पांना रंगरंगोटीही करण्यात येत आहे. या शिल्पाकृतींमधील अनेक शिल्पाकृती या ‘टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेनुसार बनविण्यात आल्या असून त्याही सुव्यवस्थित करुन घेण्यात येत आहेत. तसेच दिशादर्शक फलकांचीही दुरुस्ती केली जात आहे. चौकांमधील कारंज्याचीही आवश्यकतेप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत असून त्यासाठी वापरले जाणारे प्रक्रियाकृत पाणी नियमीत सुरु राहील, याचीही काळजी घेतली जात आहे.

नागरिकांनी आपल्याकडील नको असलेल्या वस्तू द्याव्यात आणि ज्यांना अशा वस्तुंची गरज आहे, त्यांनी त्या तेथून घ्याव्यात याकरिता नवी मुंबईत ९२ ठिकाणी थ्री आर सेंटर्स उभारण्यात आले असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मानवतेचे देणे-घेणे या संकल्पनेनुसार ९२ इतक्या मोठ्या संख्येने सुरु असलेल्या सदर ‘थ्री आर सेंटर्स'ची आवश्यकतेनुसार दुरुस्ती आणि पुनर्रचना करण्यात येत आहे.

दरम्यान, अशा प्रकारे स्वच्छतेप्रमाणेच शहर सुशोभिकरणाकडे विशेष लक्ष दिले जात असून विविध रंगसंगतीने सजलेले नवी मुंबई शहर आता अधिकच सुंदर दिसू लागली आहे. त्यामुळे नवी मुंबईकर नागरिकांप्रमाणेच शहरात विविध कामांसाठी येणाऱ्या प्रवाशांकडून आणि पर्यटकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘केडीएमसी'ला अंधारात ठेवून ‘स्टेम प्राधिकरण'चे काम